आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray News In Marathi, MNS, Divya Marathi, Aurangabad

महाराष्‍ट्रात राज यांची लाट येईल, मनसे कार्यकर्त्यांचा आशावाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काही उमेदवारांच्या विजयाची भाजप हमी देऊ शकत नव्हता, तेथे ते उमेदवार मोदी लाटेत सहज विजयी झाले. तद्वतच मला जर जनतेने कौल दिला तर मी महाराष्‍ट्राचा मुख्यमंत्री होण्यासाठी तयार आहे, असे मुंबई येथे झालेल्या सभेत मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी जाहीर केले. नरेंद्र मोदींसारखीच महाराष्‍ट्रात राज यांची लाट येईल, अशी आशा मनसे उमेदवारांना वाटत असून या लाटेत आपली नाव किना-याला लागेल, असे स्वप्नरंजन सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीत मनसेच्या दहाही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्यानंतर मनसेचे काय होईल, अशी चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे यांनी स्वत: निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह संचारला आहे.

‘आता कुठल्याही पक्षाला फाइट देऊ’ असे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. मुंबई, नाशिक येथे पक्षासाठी सकारात्मक वातावरण असल्याची चर्चा असली तरी मराठवाडा, विदर्भ या भागात मात्र मनसे उमेदवारांना आव्हान असेल. महाराष्‍ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ होत आहे. त्याचा मनसेवर काय परिणाम होईल हे लवकरच कळेल. दरम्यान, राज ठाकरे यांचा लवकरच महाराष्‍ट्र दौरा सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मनसेच्या सीट वाढण्याची आशा नाही
केंद्र आणि राज्याच्या राजकारणात बराच फरक आहे. ज्याप्रमाणे भाजपने उमेदवार निश्चित करून यश मिळवले तसे राज्यात होईल असे नाही. सध्या मनसेत कार्यकर्ते आणि पदाधिका-यांचा आत्मविश्वास गळालेला दिसतो. तो राज यांच्या सभेने जरी वाढला असेल तरी. स्वत: निवडणूक लढवणार या राज यांच्या घोषणेनंतरही राज्यात मनसेच्या जागा किती वाढतील, यात शंका आहे.
डॉ. बी. एस. वाघमारे, राजकीय विश्लेषक

आगामी निवडणुकीसाठी या नेत्यांची आहे चर्चा
हर्षवर्धन जाधव यांनी मनसेला जय महाराष्‍ट्र केला. पक्षानेदेखील ही बाब गांभीर्याने घेत अनुभवी नेते सुभाष पाटील यांना कन्नड तालुक्याची जबाबदारी दिली आहे. शहरातील पश्चिम, पूर्व आणि मध्य मतदारसंघात राज वानखेडे, गणेश वानखेडे, सतनामसिंग गुलाटी, गौतम आमराव, अरविंद धीवर, सुमीत खांबेकर, दिलीप चितलांगे यांच्या नावाची चर्चा आहे. तर ग्रामीण भागात दिलीप बनकर, शैलेश क्षीरसागर, बादशहा पटेल, संतोष जाधव, प्रशांत सदाफळे, दीपाली काळे, कमलेश कटारिया, सुभाष पाटील, नितीन खंडागळे, डॉ. सुनील शिंदे, विजय चव्हाण, भास्कर गाडेकर, बाबासाहेब डांगे यांच्या नावाची चर्चा आहे. काही पक्षांतील असंतुष्ट नेतेही मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.