आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्यासाठीचा पैसा विकासावर खर्च करा - राज ठाकरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- आठ दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदास पाठिंबा देऊन राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुजरातेत वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यास विरोध दर्शवला. ही रक्कम विकासाच्या कामांवर खर्च करावी, असा खोचक सल्लाही त्यांनी मोदींना दिला.

लातूर, बीडमधील नुकसानीची पाहणी करून राज बुधवारी येथे मुक्कामी होते. गुरुवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राजकारणावर बोलणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, मोदींचा विषय निघताच स्वत:ला रोखू शकले नाहीत. निवडणुका येताच पुतळ्यांचे राजकारण सुरू होते. सध्या गुजरातेत पटेलांचा पुतळा उभा होत आहे. हेही मला पटले नाही. परदेशात पुतळे आहेत. पण तेथील राज्यकर्त्यांनी आधी लोकांच्या गरजा पूर्ण केल्या आहेत.

अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. पण शिवरायांचे खरे स्मारक म्हणजे त्यांचे गड, किल्ले आहेत. त्यांचे पुनरुज्जीवन करणे म्हणजेच त्यांचे खर्‍या अर्थाने स्मारक उभे करणे होय, असेही त्यांनी नमूद केले.

मनसेचा मराठवाड्यात अपेक्षित प्रभाव वाटत नाही, यावर ते म्हणाले की, पक्षाची ध्येयधोरणे शेवटच्या पातळीपर्यंत पोहचवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. प्रत्येक भागात सारखेच नेतृत्व मिळते असे नाही. काँग्रेस, भाजप, शिवसेना 50 पेक्षा अधिक वर्षे जुने पक्ष आहेत. राष्ट्रवादी मातब्बर नेत्यांचा पक्ष आहे. मनसेचे वय फक्त आठ वर्षे आहे. त्यामुळे इतरांच्या तुलनेत आमचे काम व्यवस्थित सुरू आहे.

आंदोलन शांततेत झाले की फसले
माझा आणि मनसेचा डीएनए इतर पक्षांपेक्षा वेगळा आहे. आमच्या कार्यकर्त्यांना शांततेत आंदोलन कसे करायचे हेच माहिती नाही. शांततेत आंदोलन झाले की ते फसले अशी चर्चा होते. माध्यमांनाही आमच्याकडून केवळ बातम्या हव्या असतात. मात्र, आम्ही बातम्या देण्यासाठी नव्हे तर नवा समाज घडविण्यासाठी पक्ष स्थापन केला आहे, असेही राज म्हणाले.