आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'उद्धव ठाकरेंशी मनोमिलन अशक्य; हे दोन मराठी माणसांचे भांडण नाही\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘जाऊ द्या हो. जे घडायचे होते ते सारे घडून गेले आहे. आता पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी कशाला आळवायच्या?’ असे म्हणत मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासोबत मनोमिलन शक्य नाही, असे स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सुरू असलेल्या वादाचा अर्थ दोन मराठी माणसांतील भांडण असा काढू नका, असेही त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

दुष्काळग्रस्तांना न्याय देणे आणि पक्षबांधणीसाठी राज यांची जाहीर सभा दोन मार्चला जालना येथे होणार आहे. त्यासाठी ते औरंगाबादेत आले आहेत. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आठवडाभरापासून राज आणि अजित पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये त्यांचे पडसाद उमटत असून अनेक ठिकाणी त्यांनी एकमेकांवर हल्लेही केले आहेत. एकीकडे मराठी माणूस एकत्रित झाला पाहिजे, असे म्हणत असताना दोन मराठी नेत्यांमध्ये एवढे टोकाचे वाद कशासाठी, असे विचारले असता राज म्हणाले, मुळात हे मराठी माणसांतील भांडण नाहीच. त्याला तसे रूप देऊ नका. महाराष्ट्रात सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये मराठी नेते आहेत आणि मी राजकारणावरच बोलत असल्याने त्यांच्याविषयी बोलणे क्रमप्राप्त आहे. माझे पवारांशी कोणतेही वैयक्तिक भांडण नाही. महाराष्ट्रात परप्रांतांतून येणारे लोंढे मतपेट्यांमध्ये रूपांतरित होतात. त्यांच्या बळावर परप्रांतांतील लोक आमदार, खासदार होतात आणि ते परप्रांतीयांच्या अनुकूल धोरणे बनवतात. त्यालाच माझा विरोध आहे.

दोन दिवसांपूर्वी राज यांच्या ताफ्यावर अहमदनगर येथे हल्ला झाला. तेव्हा उद्धव यांनी ‘राज यांच्या पाठीशी आहोत,’ असे वक्तव्य केले होते. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनीही राज-उद्धव यांना एकत्र आणण्यासंदर्भात प्रयत्न होत असल्याचे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता राज यांनी मनोमिलनाचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला. ते म्हणाले, उद्धव आजारी पडल्यावर माझे त्याला भेटायला जाणे, हा कौटुंबिक कर्तव्याचाच भाग होता. आता त्यांचा पक्ष वेगळा आणि माझा वेगळा आहे. मनसे स्थापनेपासून मी कधीही उद्धव यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची टीका केली नाही. मराठी माणूस हाच केंद्रबिंदू असल्याने हिंदुत्ववादाकडे वळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही ते म्हणाले.

झाली ना नाराजी दूर?
बुधवारी राज शहरात मुक्कामास आले. गुरुवारी त्यांनी सुभेदारीवर पदाधिकार्‍यांच्या बैठका घेतल्या. मात्र, सामान्य कार्यकर्ते, नागरिकांना त्यांनी साधे अभिवादनही केले नाही. नियोजित वेळापत्रकात नमूद असूनही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलणे टाळणे. याविषयी ‘दिव्य मराठी’ने ‘सगळेच झाले नाराज’ असे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याचा थेट उल्लेख न करता राज यांनी ‘चला, तुमच्याशी भेटावे म्हटले. आता झाली ना नाराजी दूर!’ अशी टिप्पणीही केली.