आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोड दौऱ्यात मनसैनिक नाराज; मला न भेटणे ही चूक- राज ठाकरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड- न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे सोमवार दि.२५ रोजी सिल्लोड येथे आले होते. माजी आमदार बाळा नांदगावकर, जयप्रकाश बावीस्कर, अनिल शिदोरे, अभिजित पानसरे, अशोक तावरे राज यांच्यासोबत होते.

आजच्या दौऱ्यात तालुक्यातील एकही कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित न राहिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राज सुमारे तीन तास सिल्लोड मध्ये असताना कार्यकर्ते तर सोडाच पदाधिकारीदेखील त्यांच्या भेटीला आले नाही. राज ठाकरे नावाच्या वलयामागे पक्षाव्यतिरिक्त इतरांचेही मोठे आकर्षण असते परंतु या दौऱ्यात राज ठाकरे पदाधिकारी, कार्यकर्त्यांअभावी एकाकी जाणवत होते. राज यांचे स्वीय सहायक मनोज हाटे यांचे माजी जिल्हाध्यक्ष भास्कर गाडेकर यांच्यावरील प्रेमामुळे हा प्रकार घडला. दौऱ्याचे नियोजन भास्कर गाडेकर यांच्यावर हाटे यांनी सोपविले. गाडेकर यांनी कार्यकर्त्यांना डावलून बाहेरील व्यक्तींकडे नियोजन दिल्याने नाराज कार्यकर्त्यांनी थेट राज भेटीवरच बहिष्कार घातला. जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी दांडी मारल्याने तेही दौऱ्यात दिसले नाही. कार्यकर्तेच नसल्याने नियोजन व व्यवस्थेचा पूर्ण गोंधळ उडाला. राज यांच्यासाठी जेवणही औरंगाबाद येथून मागविण्यात आले होते.

राज यांची संघटनात्मक पकड ढिली झाल्याने मनमानी कारभार सुरू असल्याचे समोर आले.येथील कार्यकर्ते कमलेश कटारिया मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष असून संघटना बांधणीसाठी त्यांचे काम सुरू असते. त्यांची आई सरिता कटारिया मनसेच्या विद्यमान नगरसेविका आहेत. प्रमुख राजकीय पक्ष भाजप, शिवसेना व काँग्रेसच्या बरोबरीने कार्यक्रम घेण्याचा ते कायम प्रयत्न करीत असल्याने मनसेचे अस्तित्व टिकून आहे. किसनराव काळे यांचे जून २०१५ मध्ये निधन झाल्यानंतर सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील मनसेची पूर्ण जबाबदारी कटारिया यांच्या खांद्यावर आली. ही जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असून संघटन वाढीसाठी प्रयत्नशील असताना त्यांना आजच्या राज ठाकरेंच्या दौऱ्यापासून बाजूला ठेवले गेले.

मी तयारीत व्यस्त होतो
मी राज ठकरे यांच्या आजच्या सिल्लोड दौऱ्यात होतो. कोर्टात जाणे झाले नाही त्याच भागातील एका कार्यक्रमासाठीच्या तयारीला गेलो याचा अर्थ मी राज ठाकरे यांच्या दौऱ्यात नव्हतो असा होत नाही,उद्याच्याही वैजापूरच्या दाैऱ्यात मी असणार आहे.
-डॉ सुनील शिंदे, मनसे जिल्हाध्यक्ष

जबाबदारी माझ्याकडेच होती
जिल्ह्याच्या नियोजनाची जबाबदारी माझ्याकडे होती. न्यायालयीन प्रक्रियेचे काम असल्याने ते पदाधिकाऱ्यांना सांगणे गरजेचे नाही. राज ठाकरे आले म्हणजे पदाधिकाऱ्यांनी थांबलेच पाहिजे. आम्ही कुणालाही डावलले नाही. बहिष्काराचा विषय नाही.
- भास्कर गाडेकर, माजी जिल्हाध्यक्ष

मी बाहेरगावी गेलो होतो
राज ठाकरे यांचा दौरा सिल्लोडमध्ये होता. मला कौटुंबिक कामासाठी अचानक बाहेरगावी जावे लागल्याने थांबता आले नाही. अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार होते. ते का नव्हते मला कळू शकले नाही.
-कमलेश कटारिया, जिल्हा उपाध्यक्ष