आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thakare In Aurangabad But No Interaction With Media Persons

राज यांना ताप की मनस्ताप!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीत मनसेचे चित्र आशादायी असेल की नाही याबाबत शंका आहे. विविध वृत्तवाहिन्यांनी केलेल्या सर्वेक्षणात मनसेला राज्यभरात दहा जागा मिळतील, असा निष्कर्ष काढला गेला. सोमवारी त्यांनी मराठवाड्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीही गांभीर्याने घेतल्या गेल्याचे दिसले नाही.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे मराठवाड्याचा दौरा अर्धवट सोडून त्यांनी मुंबई गाठली. त्यांनी पत्रकारांशी बोलण्याचेही टाळले. त्यामुळे राज ठाकरे यांना ताप आला की मनस्ताप झाला, या चर्चेने जोर धरला होता.

नाशिक महापालिकेत आघाडीच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केल्यानंतर मनसेविषयी नकारात्मक चर्चा होण्यास सुरुवात झाली असतानाच अौरंगाबाद जिल्हा परिषदेतदेखील त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. शिवाय निवडणूक लढण्यावरूनही त्यांनी घूमजाव केले. या घटनांबाबत पत्रकार प्रश्न विचारतील याचा अंदाज राज यांना आला असावा म्हणून त्यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले. सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास हॉटेल रामा येथे पत्रकार परिषदेची व्यवस्था करण्यात आली होती. सातच्या दरम्यान राज ठाकरे पत्रकारांसामोर आले आणि "माझी तब्येत बरी नाही. गेल्या सहा दिवसांपासून मी आजारी आहे, बोलूही शकत नाही.

आपण पुढील वेळेस बोलू,' एवढेच बोलून निघून गेले. राज ठाकरे असे अचानक का निघून गेले, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांचे फड रंगू लागले. मुलाखतींबाबत तसेच उमेदवारांबाबत ते काही बोलतील, अशी आशा मनसे कार्यकर्त्यांनाही होती. त्यांचाही राज यांनी भ्रमनिरास केला.
निवडणुकीसाठी केवळ महिना शिल्लक असताना मनसेचे उमेदवार निश्चित नाहीत. लोकसभेला सपशेल पराभव झाल्यामुळे अजूनही कार्यकर्ते आणि पदाधिकारी सावरले नाहीत. अशा पार्श्वभूमीवर राज यांचे मौन कार्यकर्त्यांना काेड्यात टाकणारे ठरले.
मराठवाड्यातील सर्व जागा लढवण्याचे संकेत मनसेने दिले असले तरी सक्षम उमेदवार पक्षाला मिळतील का, ते महायुती आणि आघाडीच्या उमेवारांना टक्कर देतील का, याचा सारासार विचार केल्यानंतरच अनेक ठिकाणी मनसे आपला उमेदवार देणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.