आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा रुपयांच्या ‘प्लग पिन’ अभावी मूर्तिकाराचा अंत: राजस्थानी कुटुंबीयांवर पसरली शोककळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद: गणेशमूर्तीला रंग देताना ‘कॉम्प्रेसर’मध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने 22 वर्षीय मूर्तिकाराचा अंत झाला. ही घटना मंगळवारी सकाळी 7.30 वाजता गजानन महाराज मंदिर रोडवरील ‘वर्कशॉप’मध्ये घडली. इंदू मांगीलाल राठोड असे मृताचे नाव असून तो मूळ राजस्थानमधील रहिवासी होता. सॉकेटमध्ये थेट वायर लावल्यामुळे ते निसटून लोखंडी ‘कॉम्प्रेसर’वर पडले आणि इंदूला जीव गमवावा लागला. त्याने दहा रुपयांची ‘प्लग पिन’ लावली असती तर त्याचा जीव वाचला असता. इंदूच्या मृत्यूमुळे राठोड कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राठोड कुटुंबीय 15 वर्षांपासून गणेशमूर्ती साकारण्यासाठी शहरात दाखल होतात. इंदूने वडील मांगीलाल यांच्याकडून मूर्ती बनवण्याची कला अवगत करून तो या कामात पारंगत झाला होता. सध्या तो मुख्य मूर्तिकार म्हणून काम पाहत होता. नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता उठला व साडेसात वाजता वर्कशॉपमध्ये तयार झालेल्या गणेशमूर्तींना रंग देण्याचे काम सुरू केले.

उघडी वायर ‘कॉम्प्रेसर’वर पडली अन् घात झाला
गणेशमूर्तीला रंग देताना कॉम्प्रेसरची वायर उघडी होती. त्याला प्लग पिन न लावता इंदूने वायर थेट सॉकेटमध्ये खोचली. पिन नसल्याने वायर निसटून कॉम्प्रेसरला चिकटली. त्यामुळे विद्युतप्रवाह कॉम्प्रेसरमध्ये उतरला आणि कॉम्प्रेसर पुढे सरकवताना इंदूला जोरदार झटका बसला. त्यानंतर थोड्याच वेळात तो मृत्युमुखी पडला, असे त्याचा भाऊ भंवरलालने ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
सहा महिन्यांपूर्वीच लग्न; मृत्यूने हळहळ
कामाच्या शोधात शहर गाठलेल्या मांगीलाल आणि लक्ष्मी यांना चार मुली, तीन मुले आहेत. त्यापैकी इंदूचा मृत्यू झाला. इंदूचे सहा महिन्यांपूर्वीच राजस्थानात लग्न झाले होते. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदनानंतर सायंकाळी चार वाजता त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.