आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajendra Darda News In Marathi, Abdul Sattar, Congress, Divya Marathi

पक्षशिस्त मोडून दर्डा , सत्तार या मंत्री महोदयांनी केली उमेदवाराची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार पक्षाचा असतानाही कॉँग्रसेचे मंत्री राजेंद्र दर्डा आणि अब्दुल सत्तार यांनी तो मोडीत काढत वैजापुरातून डॉ. दिनेश परदेशी यांच्या उमेदवारीची घोषणा केली. वैजापूर नगरपालिकेने 14 कोटी 11 लाख रुपये खर्चून उभारलेले स्वयंचलित जलशुद्धीकरण केंद्र, अग्निशमन केंद्र व वाहनाचा लोकार्पण सोहळा सोमवारी पार पडला. याप्रसंगी मंत्री दर्डा व सत्तार यांनी दिनेश परदेशी यांच्या नावाची घोषणा करून टाकली.

वैजापूर मतदारसंघात पंधरा वर्षांपासून मतदार एकच बियाणे निवडत आहेत. मात्र, त्यापासून भरघोस उत्पन्न निघत नाही, त्यामुळे मतदारांनी या वेळी कॉँग्रेसचे बियाणे वापरावे, त्यातून विकासाचे भरघोस उत्पादन निघेल, असे म्हणत मंत्री सत्तार यांनी आमदार वाणींवर अप्रत्यक्ष टीका केली.

राष्ट्रवादी काय करणार ?
गेल्या विधानसभेत वैजापूर मतदारसंघ कॉँग्रेसला सुटला होता. कॉँग्रेसचे दिनेश परदेशी यांना 40 हजार मते मिळाली होती, तर राष्ट्रवादीचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी बंडखोरी करत 50 हजार मते घेतली होती. शिवसेनेचे आर. एम. वाणी अवघ्या बाराशे मतांनी विजयी झाले होते. या वेळी राष्ट्रवादीने निवडणुकीची पूर्ण तयारी केली आहे. परंतु त्यांना ही जागा मिळते की पुन्हा बंडखोरी होते, हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.

रामकृष्ण योजनेवर निर्णय
तालुक्यातील 14 गावांसाठी उभारण्यात आलेल्या रामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजनेत कर्जबाजारी झालेल्या शेतक-यांचे कर्ज माफ करून ही योजना सरकारने ताब्यात घ्यावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी यांनी मंत्र्यांकडे केली. त्यावर मंत्री राजेंद्र दर्डा व अब्दुल सत्तार यांनी आचारसंहिता लागण्यापूर्वी या योजनेसंबंधी सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.