आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajendra Darda News In Marathi, Lok Sabha Election, Congress

लोकसभेसाठी दर्डांच्या अटी, शर्ती; कॉंग्रेसची शोध मोहिम सुरूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नरेंद्र मोदी यांची लाट आणि ‘आप’च्या झंझावातातही जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात यासाठी कॉँग्रेसने तगड्या उमेदवारांना मैदानात उतरवायचे ठरवले आहे. मात्र, औरंगाबादेतून लढण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी काही अटी व शर्ती टाकल्या आहेत. तर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी विधानसभाच बरी अशी भूमिका घेत जालन्यातून लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचे उमेदवार प्रचाराला लागले असतानाही काँग्रेसची उमेदवार शोधमोहीम मात्र संपलेली नाही.


औरंगाबाद व जालन्याची निवडणूक शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार शोध एप्रिलपर्यंत चालेल असा अंदाज आहे. औरंगाबादेतून हॅट्ट्रिक केलेल्या शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात दर्डा यांनी निवडणूक लढवावी अशी श्रेष्ठींसह स्थानिक नेत्यांचीही इच्छा आहे. मात्र दर्डा यांनी लेखी नकार कळवल्याचे सांगण्यात येते. तरीही श्रेष्ठींचा आग्रह असल्याने दर्डा यांनी दोन अटी घातल्याचे समजते. लोकसभेत पराभव होवो अथवा विजय, विधानसभा निवडणुकीत पूर्व मतदारसंघ त्यांनाच हवा असल्याचे समजते. पराभूत झाल्यास स्वत: अन् विजयी झाल्यास पुढील पिढीची तजवीज करण्याचा त्यांचा कयास असल्याचे समजते.


दुसरीकडे चौथ्यांदा लोकसभेच्या दरवाजावर दस्तक देण्यास सज्ज झालेले जालन्यातील भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांना धोबीपछाड देण्यासाठी कॉँग्रेसला सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे सक्षम वाटतात. सत्तार यांचा विधानसभा मतदारसंघ पूर्णत: जालना लोकसभेत येतो. त्यामुळे त्यांचे नाव पुढे आले. मात्र त्यांनीही दर्डांचाच कित्ता गिरवत नकार दिला.


बरेच साम्य : औरंगाबादेत दर्डा-खैरे यांच्यात छुपी युती असल्यानेच दर्डा त्यांच्याविरोधात लढण्यास नकार देतात, अशी चर्चा आहे. तसेच काहीसे दानवे आणि सत्तार यांच्याबद्दल बोलले जाते. सिल्लोड-सोयगावमधून लोकसभेला दानवे यांना मदत होते, तर विधानसभेच्या वेळी दानवे त्याची परतफेड करतात, असे सांगितले जाते. सत्तार यांचा नकारही त्यामुळेच असू शकतो.


डॉ. काळे दोन्हीकडेही : या दोन्हीही मतदारसंघांतून आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या नावाची चर्चा आहे. गतवेळी ते जालन्यातून लढले. पराभव झाल्यानंतर त्यांना पुन्हा फुलंब्री विधानसभेतून उमेदवारी देण्यात आली. याच अटीवर त्यांनी यंदा पुन्हा लढावे, असा आग्रह धरण्यात येत आहे. परंतु त्यांनीही नकार दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षादेशानंतर दर्डा आणि डॉ. काळे लोकसभा लढवू शकतात, पण सत्तार यांनी स्पष्ट नकार दिला आहे.


चर्चेतील चेहरे
जालना : डॉ. कल्याण काळे, विलास औताडे, भीमराव डोंगरे, निवृत्त सनदी अधिकारी हिकमत उढाण.
औरंगाबाद : माजी खासदार उत्तमसिंह पवार, डॉ. कल्याण काळे, नितीन पाटील, मिलिंद पाटील, जे. के. जाधव.