औरंगाबाद - पाणी, सफाई मोहीम आणि शहर बससेवेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यावरच पुढील काळात माझे लक्ष केंद्रित राहणार असल्याचे मनपाचे नवनिर्वाचित सभागृह नेता राजेंद्र जंजाळ यांनी सांिगतले. ही कामे प्राधान्याने मार्गी लागावीत, यासाठी पावले उचलणार असल्याचेही ते म्हणाले.
मंगळवारी (५ मे) त्यांनी "दिव्य मराठी' कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यांनी संपादकीय सहकार्यांशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या. शहराच्या विकासात महत्त्वाचे योगदान देण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठीच मी राजकारणात
आल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वेळी बालाजीनगर वॉर्डातून पराभूत झाल्यावर जंजाळ यांनी यंदा शिवाजीनगर वॉर्डातून निवडणूक लढवून जिंकली. त्यानंतर त्यांना महापौर त्र्यंबक तुपे यांच्यासोबत मातोश्रीवर भेटीसाठी बोलावले होते.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौरांशी चर्चा झाल्यावर जंजाळ यांना सभागृह नेता म्हणून तुमची नियुक्ती झाली आहे, असे सांगितले. तेव्हा त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. ते म्हणाले की, मी कधीच या पदावर संधी मिळेल, अशी अपेक्षा बाळगली नव्हती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. तो मला सार्थ करून दाखवायचा आहे. महापौर तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध अतिशय चांगले आहेत. आम्ही तिघेही तरुण आहोत. एमआयएम, काँग्रेसकडून निवडून आलेल्यांमध्येही तरुणांचे प्रमाण चांगले असल्याचा फायदा निश्चित होणार आहे. शेवटी विरोधी बाकांवरील नगरसेवकांनाही त्यांच्या वॉर्डात विकासकामे होण्यास प्राधान्य द्यायचे आहे. म्हणून सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. पाण्याची सर्वात मोठी समस्या आहे. हंडाभर पाण्यासाठी पूर्ण कुटुंब हैराण होते.
हे चित्र बदलण्यासाठी पालकमंत्री रामदास कदम पुढाकार घेत आहेत. त्यात मीदेखील योगदान देणार आहे. मनपाचा अर्थसंकल्प तयार होण्यास वेळ असल्याने तोपर्यंत कचरा हटाव मोहिमेला वेग देण्याची सूचना मी अधिकार्यांना केली आहे. शहराच्या सर्व भागांना जोडणारी शहर बससेवा ही काळाची गरज आहे. त्यासाठीही माझे प्रयत्न सुरू असल्याचे जंजाळ म्हणाले.
समर्थनगर वॉर्डातून विजयी झालेले ऋषिकेश खैरे यांनीही "दिव्य मराठी' कार्यालयास सदिच्छा भेट दिली. तसेच त्यांनी संपादकीय सहकार्यांशी चर्चा केली. या वेळी बोलताना ते म्हणाले की, सध्या महापालिकांच्या शाळांचा दर्जा सुधारणे आणि क्रीडांगणांवरील अतिक्रमणे हटवणे याकडे मी अधिक लक्ष देणार आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ते सर्वांत जास्त महत्त्वाचे आहे. तसेच माझ्या समर्थनगर वॉर्डातील विविध समस्यांचा अभ्यास करणे सुरू केले आहे. माजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी केलेली कामे आणि त्यांचा जनसंपर्क यामुळे यंदा मला विजयी होता आले, अशी कबुलीही त्यांनी दिली.