औरंगाबाद - महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी पहिल्यांदाच निवडून आलेले माजी आमदार प्रदीप जैस्वालसमर्थक राजेंद्र जंजाळ यांची नियुक्ती करण्यात आली. या निमित्ताने महापौर त्र्यंबक तुपे यांच्यावरील रिमोट कंट्रोल नकळत जैस्वाल यांच्याकडे गेला. त्याचबरोबर या सत्ता केंद्रावरील पकड मजबूत करण्याच्या दिशेने जैस्वाल यांनी पहिले पाऊल उचलले. आता स्थायी समितीवर कोणाकोणाचे समर्थक नियुक्त होतात, हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.
या पदासाठी जंजाळ यांच्याबरोबरच मकरंद कुलकर्णी यांचे नाव चर्चेत होते, परंतु महाराष्ट्रदिनी पक्षाने जंजाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. शनिवारी जंजाळ यांनी पदभार स्वीकारला. पुढील एक वर्षासाठी ही नियुक्ती असेल. प्रारंभीपासूनच जैस्वाल यांनी जंजाळ यांचे नाव पुढे केले होते. त्यास अन्य नेत्यांनी आक्षेप घेतला नाही. पालकमंत्री रामदास कदम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.
सभागृह नेत्याचे संवैधानिक व असंवैधानिक अधिकार : सभागृह नेता हा सत्ताधारी पक्षाचा सभागृहातील नेता असला, तरी त्याला संवैधानिक अधिकार फारसे नाहीत. अधिकाऱ्यांची बैठक बोलावणे, त्यांना सूचना करणे, सभागृहात पक्षाची बाजू मांडणे, प्रस्ताव मांडणे हे कागदोपत्रीचे अधिकार या नेत्याकडे असतात. मात्र, सभागृह नेत्याला संवैधानिकपेक्षाही असंवैधानिक अधिकार जास्त आहेत. ते म्हणजे पक्षादेशाचे नाव पुढे करून थेट महापौरांवर नियंत्रण ठेवणे, नेत्यांचा आदेश महापौरांकडून पाळून घेणे, कोणता प्रस्ताव मंजूर-नामंजूर करायचा हे नगरसेवकांना सांगणे.
थोडक्यात महापौरांवर नियंत्रण ठेवण्याचे काम हा नेता करू शकतो. अर्थात, तो ज्येष्ठ असेल तर महापौरांना त्याच्यासमोर झुकणे भाग पडते; परंतु जंजाळ पहिल्यांदाच नगरसेवक झाले आहेत, ते महापौरांना कितपत धाक दाखवू शकतील, याबाबत शंका आहे.
जैस्वाल निष्ठा हीच जंजाळांची ओळख
जंजाळ शिवसैनिक असले, तरी जैस्वाल निष्ठा हीच त्यांची खरी ओळख आहे. जैस्वालांसोबत असतानाही ते जैस्वालांच्याच तंबूत होती. जैस्वाल यांनी शिवसेना सोडून शहर प्रगती आघाडी स्थापन केली, तेव्हा जंजाळ या आघाडीचे शहराध्यक्ष होते. जैस्वाल पुन्हा सेनेत परतले, त्यांच्याबरोबर जंजाळही परतले. त्यांना जिल्हाप्रमुख करावे, अशी मागणी जैस्वाल यांनी केली होती, परंतु ती अमान्य करण्यात आली. शिवाजीनगर वाॅर्ड जेव्हा खुला झाला, तेव्हा तेथून जंजाळ यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी जैस्वाल यांनी प्रयत्न केले अन् आता सभागृह नेतेपदासाठीही त्यांच्याच नावाची शिफारस केल्याने कोणत्याही शिवसैनिकाला आश्चर्य वाटले नाही, कारण जैस्वाल निष्ठा हीच जंजाळांची खरी ओळख आहे.
स्मरणातील सभागृह नेते
आमदार संजय शिरसाट, माजी आमदार किशनचंद तनवाणी, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, विद्यमान महापौर त्र्यंबक तुपे, माजी सभापती राजू वैद्य यांनी सभागृह नेते म्हणून काम केले व या पदावर
आपला ठसा उमटवला. शिरसाट दोन वेळा सभागृह नेते होते. त्यांची भीती त्यांच्याच महापौरांना वाटत होती, हे विशेष.
कुलकर्णी पडले मागे
या पदावर तरुण व अभ्यासू चेहरा देण्याचे ठरले होते. त्यामुळे जंजाळ यांच्याप्रमाणेच नव्याने नगरसेवक झालेले मकरंद कुलकर्णी यांचे नाव आघाडीवर होते. तशी चर्चाही नेत्यांमध्ये झाली होती, परंतु जेव्हा निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा कोणीही कुलकर्णी यांची तळी उचलून धरली नाही. जैस्वाल यांनी जंजाळांचे नाव लावून धरले, तर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कोणी या पदावर जातो म्हटल्यावर आमदार संजय शिरसाट यांनीही त्यांचीच री ओढळी. त्यामुळे कुलकर्णी मागे पडले.