आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

EXCLUSIVE : राजेश टोपे अडचणीत, दलित कार्यकर्त्यावर विषप्रयोग केल्याचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जालना जिल्ह्यातील खरपुडी येथील दलित कार्यकर्ते विलास अंबादास निकाळजे यांच्यावर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुशराव टोपे यांनीच विषप्रयोग करून त्यांचा खून केला, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेला महिना उलटून गेला तरी पोलिसांनी चौकशी सुरूदेखील केलेली नाही. दरम्यान, टोपे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

खरपुडीच्या गायरान जमिनीच्या वादातून टोपे पिता-पुत्रांनी विलास निकाळजे यांना जालना येथील भाग्यनगरातील आपल्या ‘अजिंक्य’ या बंगल्यावर बोलावले आणि चहातून विषप्रयोग करून त्यांचा खून केला, अशी लेखी तक्रार त्यांची आई कलाबाई व पत्नी जयश्री निकाळजे यांनी पोलिसांकडे केली आहे. खरपुडी येथील मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या पार्थ सैनिकी शाळेच्या मैदानावरील पंचरंगी ध्वज हटवण्यावरून झालेला वादच विलासच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. त्या गायरानावरील पंचरंगी ध्वज आजही पार्थ सैनिकी शळेच्या हॉर्स रायडिंग मैदानावर आहे. टोपे पिता- पुत्रांकडून आपल्या जिवितास धोका असल्याच्या तक्रारी स्वत: विलासनेही जालना तालुका पोलिस ठाणे, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिका-यांकडे केल्या होत्या.

12 जानेवारी 2013 रोजी विलासचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आईने दिलेल्या लेखी जबाबात अंकुश टोपे, राजेश टोपे, समाधान शेजूळ व जगन्नाथ निकाळजे हेच आपल्या मुलाच्या मृत्यूस जबाबदार असल्याचे नमूद केले. 22 जानेवारीस पोलिस अधीक्षकांकडेही कलाबाई आणि जयश्री निकाळजे यांनी अशीच फिर्याद दिली, तथापि पोलिसांनी या प्रकरणाची चौकशीही सुरू केलेली नाही.

प्रकरण काय?
1984 मध्ये ताबा : ‘दिव्य मराठी’च्या हाती आलेल्या कागदपत्रांनुसार जालना- खरपुडी रस्त्यावरील गट नंबर 197 मधील 2 एकर गायरान काही बौद्ध उपासकांनी 1984 मध्ये बुद्धविहारासाठी ताब्यात घेतले. तेथे बुद्धविहार, समाजमंदिर आणि भिक्खू कुटी उभारण्यासाठी ते प्रयत्नशील होते.
पाठपुरावा : विलास निकाळजे व आम्रपाली महिला मंडळाचे सदस्य या गायरानावर बुद्धविहाराची नोंद घ्यावी म्हणून तहसीलदार, जिल्हाधिकारी व मंत्रालयाशी सातत्याने पत्रव्यवहार करत होते. त्याला प्रतिसाद देत ती जागा विहाराला देण्याची प्रक्रिया सुरूही झाली होती.
वादाचे कारण : याच गटात 34 एकर गायरान अंकुश टोपे अध्यक्ष असलेल्या मत्स्योदरी शिक्षण संस्थेला देण्यात आले. सुमारे सात वर्षांपूर्वी संस्थेने येथे पार्थ मुलांची निवासी सैनिकी शाळा सुरू केली. 2010 मध्ये संस्थेने 34 एकरांबरोबरच बुद्धविहाराच्या 2 एकर जागेलाही कुंपण घालून ती ताब्यात घेतली. त्याला विरोध करणा -या ना पोलिसांनी हुसकावून लावले आणि येथूनच संघर्ष सुरू झाला.
संघर्ष : विलास निकाळजे तेव्हापासून टोपे पिता-पुत्रांच्या या कृतीविरुद्ध लढत होता. त्यासाठी त्याने जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2010 मध्ये 2 ते 9 सप्टेंबर असे 8 दिवस उपोषण केले होते. त्याने दोन वेळा आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची नोंद पोलिसांकडे आहे. बुद्धविहाराची जागा मोकळी करा, या मागणीसाठी तो तुरुंगातही गेला होता.

असा घडला घटनाक्रम
9 जानेवारी 2012 : सकाळी 9 वाजता समाधान शेजूळ व जगन्नाथ निकाळजे यांच्यासोबत विलास निकाळजे जालन्याला टोपेंच्या बंगल्यावर निघाले.
10 वाजेच्या सुमारास ते पोहोचले.
रात्री 8 वाजेच्या सुमारास विलास निकाळजेला उलट्या होऊ लागल्या. रात्री 9 वाजेच्या सुमारास त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
12 जानेवारी 2012 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना विलासचा मृत्यू झाला, असे कलाबार्इंच्या तक्रारीत नमूद आहे.

शवविच्छेदनाचीही घाई
नियमानुसार सायंकाळी सहा वाजेनंतर शवविच्छेदन केले जात नाही. मात्र, विलास निकाळजेचा जालन्याच्या जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात त्याचे 12 जानेवारी रोजी रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले.

जबाबानुसार तपास सुरू
विलासच्या आईने दिलेल्या जबाबानुसार तपास सुरू आहे. मात्र जबाबात म्हटल्याप्रमाणे अद्याप काहीही निष्पन्न झाले नाही. या प्रकरणात नेमका काय तपास केला हे उघड करता येणार नाही.’
रोहिदास जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी

टोपेंविरुद्ध 24 तक्रारी!
विलासने तालुका पोलिस ठाणे, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे 24 तक्रारी केल्या होत्या. त्यात टोपेंकडून जिवाला धोका असल्याचे म्हटले आहे. विलासने 4 जुलै 2012 रोजी पोलिस अधीक्षकांकडे शेवटची तक्रार केली. त्यात पोलिसही ध्वज हटवण्यासाठी दबाव टाकत असल्याचे नमूद आहे. 22 जुलै 2012 रोजी जिल्हाधिका -या कडील तक्रारीत टोपेंनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे.

टोपे म्हणतात...
पुरावा तर नाहीच; पण तशी कुणाची तक्रारही नाही
आरोप राजकीय हेतूने होत आहेत. मी त्या व्यक्तीला आयुष्यात कधीही भेटलो नाही. विलास निकाळजेच्या मृत्यूस आम्ही कारणीभूत असल्याचा पुरावा नाही. तशी तक्रारही नाही. त्याचा मृत्यू कशामुळे झाला हे अजून स्पष्ट नाही. ती जमीन पार्थ सैनिकी शाळेसाठी आरक्षित आहे. तेथे पंचरंगी झेंडा लावलेला आहे. कदाचित तो शाळा झाल्यानंतर कुणीतरी लावला असावा.’
राजेश टोपे, उच्च शिक्षणमंत्री