आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - बनावट महिला उभी करून कागदपत्रांच्या आधारे चिकलठाणा येथील 30 बाय 40 चा भूखंड लाटण्याचा प्रयत्न करणारा मुख्य आरोपी राजकुमार जैनने पोलिसांना भंडावून सोडले आहे. गुन्हा घडला त्या वेळी हसरूल कारागृहात होतो, असे त्याने सांगितल्याने पोलिस चक्रावून गेले. ताब्यात असलेल्या जैनला गुरुवारी सायंकाळी अटक करण्यात आल्याची माहिती सिटी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक अर्जुन भांड यांनी दिली.
नारळीबागेतील उमा त्रिपाठी यांच्या नावे असलेला चिकलठाणा येथील गट क्र. 398 मध्ये 13 व 14 क्रमांकाचा 30 बाय 40 चा प्लॉट बनावट कागदपत्रे आणि फोटोच्या आधारे विशेष कार्यकारी अधिकारी शकुंतला सिरसाठ, रोशन वेरणेकर आणि व्यापारी राजकुमार ऊर्फ जवाहरलाल पन्नालाल जैन यांनी बळकावण्याचा प्रयत्न केला.
याबाबत आर्थिक गुन्हे शाखेने सिरसाठ, वेरणेकर आणि जैन यांना ताब्यात घेतले. त्यापैकी सिरसाठ आणि वेरणेकर यांना लगेचच अटक करण्यात आली. मात्र घटना घडली त्यावेळी जैन एका प्रकरणात हसरूल कारागृहात होता, अशी माहिती त्यानेच दिली. यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत हसरूल कारागृहात चौकशी केली. तेव्हा या गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्याला सायंकाळी अटक करण्यात आली. शिरसाट आणि वेरणेकर यांना न्यायालयाने 5 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.