आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अच्छे दिन अजून आलेच नाहीत !, खा. राजू शेट्टींचा घरचा अाहेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देशात ‘अच्छे दिन’ आणण्याचा वादा केला होता खरा, पण गेल्या एका वर्षात ते अच्छे दिन काही आले नाहीत. सरकारच्या कामावर आम्ही असमाधानी आहोत. शेतकऱ्यांच्या बाबतीत तर त्यांनी काहीही केले नाही, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला घरचा आहेर दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मराठवाडा कार्यकारिणी बैठक गुरुवारी औरंगाबादेत झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. खा. शेट्टी म्हणाले, कोणत्याही सरकारचे मूल्यमापन एका वर्षात करता येणार नाही. ते घाईचे होईल, परंतु जी स्वप्ने दाखवली गेली होती. ती काही पूर्ण झालेली नाही. आम्ही सरकारच्या कामाबाबत असमाधानी आहोत. शेतकऱ्यांच्या बाबतीत तर ‘अच्छे दिन’ येतील असे कोणतेही काम सरकारने केले नसल्याची टीकाही त्यांनी केली. आधीचे सरकार हे घोटाळेबाजांचे सरकार होते, परंतु आताचे सरकार हे आम्ही निवडून दिले आहे.
त्यांना योग्य ते निर्णय घेण्यास आम्ही भाग पाडू, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, सुभाष माने, रविकांत तुपेकर, संतोष सूर्यवंशी, अनिल सटाले, विजय भंडे, प्रा. जालिंदर पाटील, प्रकाश मोकळे आदी उपस्थित होते.

पाणी वाटप कायद्यानुसारच हवे
मराठवाड्याच्या पाण्याबाबतीत बोलताना खा. शेट्टी म्हणाले, विभाग कोणताही असो, नियमानुसारच पाणी मिळायला हवे. उद्योगाला बेसुमार पाणी देताना कोणी विचार करत नाही, परंतु शेतीच्या पाण्यावरून शेतकऱ्यांमध्ये वाद लावून दिले जातात. जल आयोगाने जे ठरवून दिले, त्यानुसार पाणी द्यायला हवे, अशी सूचना त्यांनी केली.
गोवंश हत्याबंदीमागे काळेबेरे
गोवंश हत्या बंदी हा कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटण्याचा गोरखधंदा आहे. स्वत:ला समाजसेवक म्हणवणाऱ्या गोवंश हत्याबंदीच्या समर्थकांनी नावे कळवावी, आम्ही त्यांच्याकडे भाकड जनावरे पाठवू. त्यांची मुले पाळणाघरात राहतात. शेतकऱ्यांकडे अशी पाळणाघरे नाहीत. अशी बंदी घालून भाकड जनावरे सांभाळणाऱ्या संस्था उभ्या करायच्या व कोट्यवधींचे अनुदान लाटायचे, असा हा धंदा आहे, असे शेट्टी म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...