आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजू शिंदे भारतीय जनता पक्षात परतणार असल्याचे संकेत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती आणि माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांचे कट्टर समर्थक राजू शिंदे हे लवकरच भारतीय जनता पक्षात परतणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पावणेदोन वर्षापूर्वी बंडखोरी करून स्थायी समितीचे सभापतिपद मिळविले म्हणून त्यांना पक्षातून निलंबित
करण्यात आले होते.
या संदर्भात पक्षातर्फे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे आणि प्रदेश चिटणीस अतुल सावे यांची द्विसदस्यीस समिती नियुक्त करण्यात आली होती. समितीने आपला अहवाल प्रदीर्घ कालावधीनंतर नुकताच श्रेष्ठींसमोर सादर केला. शिंदे जेव्हा पक्षात परतण्याची वेळ येईल, तेव्हाच ही समिती अनुकूल असा अहवाल सादर करेल, असे पक्षातील सूत्रांनी तेव्हाच स्पष्ट संकेत दिले होते. आता हा अहवाल सादर झाल्यामुळे शिंदे यांना रीतसर पक्षात घेतले जाणार, हे निश्चित आहे.
मे 2009 मध्ये स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत शिंदे यांनी श्रेष्ठींच्या मदतीने शिवसेनेशी बंडखोरी करून हे पद मिळवले होते. त्यामुळे युतीत बेबनाव झाला होता.
शिंदे यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेने केली होती. राजीनामा घेण्याऐवजी पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे
राजीनामा घेण्याचा अधिकार पक्षाला राहिला नाही. ही भाजपचीच खेळी होती.
मी मनाने भाजपमध्येच - पक्षाने माझ्यावर कारवाई केली होती. मी मनाने भाजपमध्येच होतो. माझ्याविषयी त्यांनाच निर्णय घ्यायचा आहे. मी पक्षाचा पाईक आहे. - राजू शिंदे, स्थायी समिती सभापती.
अहवाल श्रेष्ठींकडे सादर - दोनच दिवसांपूर्वी आम्ही शिंदे यांच्या चौकशीचा अहवाल श्रेष्ठींकडे सादर केला. त्यावर तेच निर्णय घेतील. सुनावणीची संधी देण्यात आल्याने अहवाल देण्यासाठी वेळ लागला. त्यावर श्रेष्ठी निर्णय घेतील. - अतुल सावे, प्रदेश चिटणीस, भाजप