आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राका लाइफस्टाइल क्लबचा करार रद्द करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- हुक्का पार्लरमुळे अनेक गैरप्रकारांचा पर्दाफाश झाल्यानंतर महापालिकेने अखेर ज्योतीनगरातील राका लाइफस्टाइल या क्लबला टाळे ठोकले. मनपाचे बीओटी विभागप्रमुखच कारवाईला कचरत असताना अखेर आयुक्त प्रकाश महाजन यांच्या आदेशानंतर हा क्लब रात्री उशिरा सील करण्यात आला. आता या क्लबची मान्यता रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून त्या बाबतीतील कागदपत्रे तयार करण्याचे काम सोमवारपासून सुरू होणार असून कायदेशीर सल्ला घेऊन पुढील पावले उचलली जाणार आहेत.
पोलिस आयुक्तांमुळे मनपाच्या बीओटी प्रकल्पात सुरू असलेले गैरप्रकार एकामागोमाग एक उघडकीस येत गेले. सर्वच राजकीय पक्षांशी जवळीक असल्याने राकांवर कठोर कारवाई करण्यास मनपाचे अधिकारी, खासकरून बीओटी विभागप्रमुख सिकंदर अली टाळत होते. स्विमिंग पूल पाहता येणाऱ्या पारदर्शक काचा, पूल टेबल पार्किंगची जागा गिळंकृत करण्याचा प्रकार उघड झाला. पाठोपाठ काल महापौर, उपमहापौर आयुक्तांनी पाहणी केल्यावर चक्क लेडीज पार्लरमध्ये सुरू असलेले मसाज पार्लरही आढळले. या साऱ्या प्रकाराने गंभीर वळण घेतल्याने संतापलेल्या मनपा आयुक्त महाजन यांनी ताबडतोब क्लबला सील लावण्याचे आदेश दिले. आदेश देऊन ते निघून गेले, पण नंतर त्यातून काय मार्ग काढता येईल यासाठी मनपाचे अधिकारी क्लबच्या संचालकांसोबत चर्चा करीत बसून होते. शेवटी रात्री उशिरा या क्लबला एकदाचे कुलूप ठोकण्यात आले.
आता करार रद्द करणार?
क्लबच्या संचालकांचे राजकीय वजन खूप असल्याने ही कारवाई करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पुढचे पाऊल उचलताना अडचणी येत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे कालपर्यंत या क्लबचा करार रद्द करण्याच्या घोषणा झाल्या असल्या तरी ते होऊ शकेल का याची खात्री देता येत नाही. सोमवारपासून करार रद्दच्या हालचाली सुरू होणार आहेत. महिलांच्या सुरक्षेचाच प्रश्न ऐरणीवर आल्याने मनपाची या प्रकरणात नाचक्की झाली आहे. या क्लबवर मनपाने लक्ष का दिले नाही याचा जाब विचारला जाणार असून शहरात या प्रकाराचे संतप्त पडसाद उमटत आहेत. करार रद्द करायचा झाल्यास सर्वसाधारण सभेत तसा निर्णय घ्यावा लागणार आहे.