आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बहीण-भावाच्या प्रेमाचे संवर्धन करणारा सण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - रक्षाबंधन हा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण आहे. श्रावणातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. बहीण -भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा हा सण आहे. या पौणिमेला नारळी पौर्णिमा, असेही म्हणतात. कोळीबांधवांच्या दृष्टीने या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. समुद्राला नारळ वाहून कोळी बांधव कृतज्ञता व्यक्त करतात.

यंदा श्रावण नक्षत्र, पौर्णिमा आणि र्शावणमास असा त्रिवेणी संगम रक्षाबंधनाच्या दिवशी आहे. दुपारी 1.30 ते 3 पर्यंतचा काळ वगळता राखी बांधण्याचा मुहूर्त दिवसभर आहे. वैदिक काळापासून रक्षाबंधन किंवा रक्षामंगळ या संस्काराची प्रथा आहे. देवराज इंद्र यांच्या पत्नीने आपल्या पतीच्या मनगटात एक दोरा बांधला व त्या दोर्‍याच्या सार्मथ्याने वृत्रनामक राक्षसावर इंद्राने सहज विजय मिळवला. याच कथेची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची प्रथा सुरू झाली. इतिहासात आपल्या रक्षणासाठी अनेक स्त्रियांनी राजांना राखी बांधल्याचा उल्लेख आहे.

बहिणीने भावाला उजव्या हाताला रेशमी धाग्याची राखी हे प्रेमाचे प्रतीक बांधून, नाते पक्के करण्याची ही पद्धत आहे. उत्तर भारतातही हा सण साजरा केला जातो. ज्यांना भाऊ किंवा बहीण नाही, तेही नाते प्रेमाने निर्माण करतात. मानवी नात्यांच्या माध्यमातून अशा विशिष्ट दिवशी एकत्र येणे, आनंदाचा अनुभव घेण्याचा योग निमित्ताने घडतो. कोळी बांधवांच्या दृष्टीने या सणाला फार मोठे महत्त्व आहे. हा सण ते नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात.
धाग्याचे महत्त्व - राखीचा धागा हादेखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे ते पवित्र बंधन आहे. एवढय़ाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळून मन प्रफुल्लित होते. हा सण एकमेकांना जोडणारा आहे. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते असा समाज सार्मथ्यशाली बनतो, हाच या राखीपौर्णिमेचा संदेश आहे.
येन बद्धो बलीराजा दानवेंद्रो महाबला
तेन त्वां प्रतिबध्नामि रक्षे मां चलमाचल
ब्राह्मण मंडळी आपापल्या यजमानांना हा मंत्र म्हणून राखी बांधतात. भाऊ-बहिणीचे प्रेम हे अत्यंत पवित्र असते. भावाच्या कल्याणासाठी देवाजवळ प्रार्थना करतात.
राखीपौर्णिमेच्या दिवशी बहिणीने आपल्या भावाला राखी बांधावी तसेच भावाने बहिणीचे रक्षण करावे, असा हा सण साजरा करण्याचा उद्देश आहे.’’ अनंत पांडव गुरुजी.
टिळ्य़ाचे महत्त्व - भावाला राखी बांधण्यापूर्वी बहीण त्याच्या कपाळावर टिळा लावते. हा फक्त आदराचा भाग नसून भावाच्या मस्तकातील सद्विचार तसेच सद्बुद्धी जागृत राहण्यासाठीची पूजा आहे. सामान्य डोळ्यांनी जे पाहू शकत नाही ते सर्व विकार, भोग, लोभ, मत्सर, वासना, द्वेष, राग आदी भावाने आपल्या तिसर्‍या डोळ्याने पाहावे या हेतूने बहीण भावाला टिळा लावून त्रिलोचन बनवते, याचा अर्थ आहे.