आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘त्या’ बहिणींना मिळणार अनोखी भेट, मोताळे यांनी व्हॉट्सअॅपवर केले होते आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा परिसरातील भगवानबाबा बालिकाश्रमातील १०० अनाथ मुलींच्या चेहऱ्यावर रक्षाबंधन सणाला हास्य फुलणार आहे. ज्यांना कधीच बघितले नाही, कधीच बोलणे झाले नाही अशा अनोळखी भाऊरायांकडून त्यांना रक्षाबंधनाला नव्या कोऱ्या चपलांची भेट मिळणार आहे. या उपक्रमाबाबत ज्येष्ठ नागरिक अनंत मोताळे यांनी १५ दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपवर आवाहन केले हाेते. त्याला १०० भाऊरायांनी प्रतिसाद दिल्याने या अनाथ भगिनींचा रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित होणार आहे.
अन्न वाचवा समिती, घनकचरा व्यवस्थापन आणि सुधांशू महाराज सत्संग समितीतील सक्रिय सदस्य अनंत मोताळे यांची आता बालिकाश्रमातील मुलींच्या मदतीसाठी धावून जाणारे आजोबा अशी नवीन ओळख झाली आहे. महिनाभरापूर्वी त्यांनी मुलींसाठी कपडे गोळा करण्याचा उपक्रम राबवला. एका आवाहनावर एवढे कपडे जमा झाले की ते किमान दोन वर्षे पुरतील.
व्हॉट्सअॅपवर केले आवाहन
अनंत मोताळे व्हाॅट्सअॅपवर अनेक ग्रुपवर सक्रिय आहेत. या ग्रुपवर त्यांनी मुलींना चपला देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. शंभर जणांनी प्रत्येकी १०० रुपये जमा केले. यास जोरदार प्रतिसाद मिळाला. अवघ्या १५ दिवसांत १०० चपलांसाठी पैसे जमा झाले. ९० वर्षांच्या सीता अग्रवाल यांनी त्यांच्या भजनी मंडळातील ३६ सदस्यांकडून वर्गणी जमा केली, तर डॉ. शुभांगी शेटकर यांनीही १५ जणांकडून पैसे जमा केले. यातून १०० वर चपलांसाठी पैसे जमा झाले. १९ तारखेला सीता अग्रवाल यांच्या हस्ते मुलींना नव्या कोऱ्या चपलांची भेट मिळणार आहे.

रक्षाबंधन खास
आमच्या एका आवाहनाला प्रतिसाद देत अनेक हात मदतीसाठी पुढे आले. बघता बघता शंभर बहिणींना चपला घेण्यासाठी वर्गणी जमा झाली. पैसे देणाऱ्यांना ते कोणासाठी देताहेत हे माहिती नाही, तर ही भेट कोणाकडून मिळतेय हे या बहिणींना माहिती नाही. अनोळखी भावांच्या भेटीमुळे यंदाचे त्यांचे रक्षाबंधन खास ठरणार आहे. -अनंत मोताळे, संयोजक
बातम्या आणखी आहेत...