आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगता मिरवणूक उत्साही, भीमलेकरांचे अभिवादन; मोहक देखाव्यांतून सामाजिक संदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. आंबेडकर जयंती उत्सव सांगता मिरवणुकीत अभिवादनासाठी जमलेला ‘निळा सागर’. - Divya Marathi
डॉ. आंबेडकर जयंती उत्सव सांगता मिरवणुकीत अभिवादनासाठी जमलेला ‘निळा सागर’.
साेलापूर- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती उत्सव सांगता मिरवणुकीत लाइव्ह डीजे, लेझर शो, लाइव्ह व्हिडिओ यांच्या सोबतच थिरकरणारी तरुणाई जय भीमचा गजर करीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाली. यंदाचे विशेष आकर्षण म्हणजे अाकर्षक देखावे आणि विविध मंडळांनी दिलेले सामाजिक संदेश. 

डॉल्बीच्या बेभान सुरांवर थिरकणारी तरुणाई उत्साहाच्या निळ्या लाटेवर स्वार झालेली दिसून आली. मिरवणुकीत सहभागी होताना डॉ. आंबेडकर यंाच्या पुतळ्याला अभिवादन केले जात होते. रविवारी सकाळी ११ वाजल्यापासून पार्क चौकात विविध मंडळे, कार्यकर्ते उत्साहात दाखल होत होते. 

निळे झेंडे, गमजा, निळ यांची रेलचेल होती. जय भीमच्या घोषणा घुमत होत्या. सायंकाळी पाचच्या सुमारास बहुतांश मंडळे मिरवणूक मार्गावर दाखल झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यंाच्या पूतळ्यापासून डफरीन चौक, महापौर बंगला, स्टेशन, भय्या चौक, मेकॅनिकी चौक, छ. शिवाजी चौक असा मिरवणूक मार्ग होता. बहुतांश मंडळांनी स्वतंत्र लाइट, डीजे किंवा डॉल्बी सिस्टिम होती. प्रखर झोतांचे लेझर दिव्यांच्या लखलखाटांमुळे उत्साह संचारला होता. लाइव्ह व्हिडिओ वॉलही काही मंडळांनी लावले होते. 

पी. बी. ग्रुपने सामाजिक संदेश देत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे यांचे भव्य पुतळे रथावर विराजमान केले. त्यातून महापुरुषांचे आदर्शवत कार्य समोर ठेवले. 

महात्मा फुले तरुण मंडळाने संसदेचा देखावा सादर करून त्यासमोर बाबासाहेबांची भव्य मूर्ती असा देखावा सादर केला. याशिवाय बुद्धराष्ट्र प्रतिष्ठान, पंचशील तरुण मंडह, भीमरत्न क्रीडा युवक मंडळ, भीमराज बहुउद्देशीय मंडळ, सम्राट क्रीडा मंडळ, त्रिरत्न क्रीडा मंडळ, पी. एन. प्रतिष्ठान, बॉबी मित्र मंडळ, भीमरत्न संस्था, संघर्ष प्रतिष्ठान, भीमक्रांती मंडळ, महाबोधी मंडळ, छ. शाहूराजे प्रतिष्ठान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्था कुंभार वेस आदी मंडळांनीही मिरवणूक मार्गावर विविध देखावे सादर केले. 

जी. एम. ग्रुपने मनुस्मृती दहनातील देखावा सादर करून २५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिवसाचे महत्त्व विशद केले. सुभेदार रामजी मंडळाने सर्वधर्म समभाव या विषयावर देखावा सादर केला. 

बॉबी ग्रुप मंडळाने विविध सामाजिक संदेश देऊन रथ सजवला. भीमक्रांती मंडळाने पाणी वाचवा, मुलींना शिक्षित करा, पर्यावरण वाचवा, सुरक्षित वाहन चालवा आदी संदेश मिरवणुकीद्वारे दिला. महाबोधी मंडळाचा विविध झुंबराच्या सहाय्याने सजवलेला रथ मिरवणूक मार्गावर होता. महाबोधी मंडळाने चलो बुद्ध की ओर हा वैशिष्ट्यपूर्ण देखावा सादर केला. डॉ. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हाचा देखावा सादर केला. यातील बुद्धांची भव्य ध्यानस्थ मूर्ती डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचा समावेश असलेला खास देखावा आकर्षित ठरला. 

पी. बी. ग्रुपच्या मिरवणुकीचे उद््घाटन महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते झाले. या वेळी पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, नगरसेवक आनंद चंदनशिवे, अॅड. संतोष न्हावकर, पोलिस उपायुक्त सुभाष नेवे, बसपचे अॅड. संजीव सदाफुले, राहुल सरवदे आदी उपस्थित होेते. मिरवणुकीत सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न मंडळाने केला. अनेक महापुरुषांच्या पुतळ्यांचा समाविष्ट होता. मंडळाचे अध्यक्ष भीमा इंगळे, गौतम चंदनशिवे, कार्याध्यक्ष बंटी माने आदी उपस्थित होते. 

ग्रामविकासमंत्री मुंडे यांची उपस्थिती 
जी.एम. मागासवर्गीय संस्थेच्या रथाचे उद्घाटन ग्रामविकासमंत्री पंकजा मंुडे, समाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झाले. या वेळी जी. एम. संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, दत्ता वाघमारे, महापौर शोभा बनशेट्टी, राजाभाऊ हौशेट्टी, नगरसेवक विनायक वीटकर, उत्सव अध्यक्ष मुकेश सोनवणे, पप्पू गायकवाड आदी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...