आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभापतींना समिती वाटपाची प्रतीक्षा, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन आजारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्हा परिषदेतील विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली असली तरी सभापतींना समित्या वाटप करून देण्यात आल्या नाहीत. यासाठी गुरुवारी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीराम महाजन आजारी असल्याने ही बैठक रद्द करण्यात आली.
सभापती म्हणून निवड करण्यात आली तरी प्रशासकीय पातळीवर कोणती समिती मिळणार हे निश्चित करण्यात आले नाही.त्यामुळे सभापती शासकीय नोंदीवर नाव घेण्यासाठी आणि कामकाज लवकर सुरू करण्यासाठी आतुर झाले आहेत. ही आतुरता संपण्यासाठी 30 ऑक्टोबर रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार होती. अध्यक्ष म्हणून महाजन यांची ही पहिलीच सर्वसाधारण सभा होती. मात्र त्यांच्यावर एमजीएम हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या पश्चात उपाध्यक्ष बैठक घेऊ शकले असते. पण महाजन यांच्या आनंदावर विरजण पडू नये म्हणून बैठकच रद्द करण्यात आली. येत्या दहा दिवसांत ही बैठक घेण्यात येणार आहे.
प्रशासकीय पातळीवर नोंद नाही :
विषय समिती सभापती म्हणून मनसेचे संतोष जाधव आणि काँग्रेसचे विनोद तांबे यांची निवड करण्यात आली आहे. तडजोडीनुसार तांबे यांची शिक्षण व आरोग्य समिती सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर जाधव यांची बांधकाम व अर्थ समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ही नोंद प्रशासकीय पातळीवर घेण्यात आली नाही.