आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामनगरच्या शाळेला मिळाले दोन कायमस्वरूपी गुरुजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वैजापूर तालुक्यातील रामनगर येथे एक दिवस शाळा भरवून ती बंद करण्यात आली होती. परिणामी २१ विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रकरणी डीबी स्टारने वृत्त प्रसिद्ध होताच संतप्त गावकऱ्यांनी उपशिक्षण विभागाला कुलूप ठोकले. त्यामुळे ही शाळा नियमित सुरू झाली. एवढेच नव्हे, तर आता शाळेला दोन कायमस्वरूपी शिक्षकही देण्यात आले आहेत.
वैजापूर तालुक्यात गोळवाडी शिवारात रामनगर येथे २००१ पासून वस्ती शाळा सुरू करण्यात आली होती. भव्य इमारतीसह सर्व सुविधा असलेली ही शाळा केवळ उद्घाटनापुरती सुरू झाली. परिणामी ३५ वस्त्यांना लागून असलेल्या या शाळेत २१ विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले होते. डीबी स्टारने ‘रामनगरात भरली एक दिवसाची शाळा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. त्यामुळे गावकऱ्यांनाही बळ मिळाले. गावकऱ्यांचे शिष्टमंडळ सोमवारी वैजापुरातील शिक्षण विभागात धडकले. तेथे कुणीच नसल्याने त्यांनी कार्यालयाला कुलूप ठोकले. काही वेळाने तेथे पोहोचलेले गटशिक्षणाधिकारी शिरोटे यांनी १ शिक्षक देऊन शाळा तात्पुरती सुरू करण्याचे आदेश दिले.
हे आहेत गुरुजी :
पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना गणेश रोठे हे शिक्षक, तर दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांना राजू डिगे हे गुरुजी शिकवत आहेत. शाळा सुरू करण्यात मदत करणारे सुरेश फुलारे, सारंग टिके यांचा १५ आॅगस्ट रोजी सत्कार करण्यात आला. या वेळी मच्छिंद्र पगारे, दिगंबर वाघचौरे, अब्बू पठाण, भाऊसाहेब रोठे, राजेंद्र सुरासे, सूर्यवंशी यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती.