आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवपुतळा सुशोभीकरण सोहळ्यात रंगली सर्वपक्षीय जुगलबंदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभीकरण उद्घाटन सोहळ्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांमध्ये खुमासदार जुगलबंदी रंगली. पालकमंत्री छगन भुजबळ, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, शिवसेना नेते रामदास कदम यांनी एकमेकांना मित्र म्हणवत, विकासासाठी पक्षीय भेद विसरण्याचे महत्त्व सांगत राजकीय हल्लाही चढवला.

छत्रपती शिवरायांचा वारसा टिकवत सर्व जाती-धर्मांच्या लोकांना संघटित करून नाशिकच्या विकासासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आल्याचे कौतुक करतानाच आठवले यांनी भुजबळांना ‘आम्हाला आता सत्तेची संधी हवी असल्याने, तुमचे सहा महिनेच राहिले आहेत,’ असा टोला लगावला. सत्ताधारी-विरोधक सहजासहजी एकत्र येत नाहीत; मात्र राजकारणात काहीही होऊ शकत असल्याने पूर्वीचे मित्र आजचे विरोधक झाल्याची आठवण करून देत आठवले म्हणाले, ‘विरोधक असलो तरी मैत्रीचे बंध कायम असल्याने भुजबळांच्या निमंत्रणावरून चहा घेण्यासाठी गेलो. तीन वेळा लोकसभेवर निवड झाली; परंतु गेल्या वेळी शेजारच्या शिर्डीत पराभव झाला. पण, नेहमी असे घडणार नाही.’

कुंभमेळ्यापूर्वीच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा शिवमेळा भरल्याचे गौरवोद्गार काढत भुजबळ यांनी छत्रपती शिवरायांना समजून घेण्यासाठी नरेंद्र मोदींची गरज नसल्याचा हल्ला चढवला. ‘छत्रपतींची पहिली समाधी महात्मा जोतिबा फुले यांनी शोधली व पहिला पोवाडाही लिहिला. डॉ. आंबेडकरांनी शिवचरित्राचे जगभरात इंग्रजीतून विश्लेषण केले,’ असे सांगून ते म्हणाले, पालिकेच्या लोकोपयोगी निर्णयासाठी सर्वांनी पक्ष व मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे.

‘सर्व पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर आणून नाशिककरांनी इतिहास घडवला. असेच वातावरण महाराष्ट्रात निर्माण झाल्यास राज्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही’, असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी केले. महापुरुषांचे पुतळे उभारल्यानंतर त्यांच्या संदेशानुसार वाटचाल केली पाहिजे. निवडणूक संपल्यावर मतभेद विसरून विकास साधला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानावरून बोलताना महापौर यतिन वाघ म्हणाले, ‘शहरात विकासकामे सुरू होत आहेत. महापालिकेचे उत्पन्न र्मयादित असल्याने शासनाने निधी लवकर देण्याची आवश्यकता आहे.’

आमदार बबनराव घोलप, रिपाइं नेते काकासाहेब खंबाळकर, तानसेन नन्नावरे यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर खासदार समीर भुजबळ, आमदार जयंत जाधव, शिवसेना जिल्हाप्रमख विजय करंजकर, रिपाइं जिल्हाप्रमख प्रकाश लोंढे, स्थायी समिती सभापती आर. डी. धोंगडे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, सुनील कांबळे, दिलीप दासवाणी आदी उपस्थित होते. नगरसेवक सुनील वाघ आणि वैशाली दाणी यांनी प्रास्ताविक केले.

यशवंतराव चव्हाणांचा विसर
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या अनुपस्थितीत नवख्या नगरसेविका वैशाली भागवत यांनी आक्रमक भाषण करून या ऐतिहासिक पुतळ्याचे अनावरण करणारे स्व. यशवंतराव चव्हाण यांचा सर्वांना विसर कसा पडला, याबद्दल जाब विचारला.

आठवले यांना शुभेच्छा
25 डिसेंबरला वाढदिवस असलेल्या आठवले यांना बिटको चौकातछगन भुजबळ, प्रकाश लोंढे, विश्वनाथ काळे, अमोल पगारे, गोटीराम पवार, सुनील यशवंते आदींच्या उपस्थितीत केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या.

महायुतीतील भाजप कार्यक्रमात एकाकी
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात महायुतीतील प्रमुख पक्ष भाजप एकाकी पडल्याचे दिसले. सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे नाव होते. मात्र, त्यांना निमंत्रणच नसल्याने ते अनुपस्थित होते, तर भाजपचे उपमहापौर सतीश कुलकर्णी यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्याने त्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहणे टाळले. भाजपचे नगरसेवक संभाजी मोरुस्कर व सतीश दलवाणी हे कार्यक्रमास उपस्थित होते; मात्र त्यांना बोलण्याची संधी दिली नाही. काँग्रेसचे नेते व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत असूनही त्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. निमंत्रण पत्रिकेत मनसेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांचे नाव वगळण्यात आल्याने नाशिकरोडमधील पक्षाच्या नगरसेवकांनी कार्यक्रमावर अघोषित बहिष्कार टाकला.