आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरे यांचे भाजपशी संबंध चांगले नाहीत, पण माझ्यासोबत चांगले- रामदास आठवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - शिवसेना- भाजप- रिपाइं एकत्र असले तरी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे व भाजपचे संबंध फारसे चांगले नाहीत. परंतु माझे व उद्धव ठाकरे यांचे संबंध चांगले असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी पैठण तालुक्यातील मुधलवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात व्यक्त केले. आमदार संदिपान भुमरे, सरपंच भाऊ लबडे, रिपाइंचे बाबूराव कदम, मिलिंद शेळके, पप्पू कागदे, प्रशांत शेगावकर यांची  प्रमुख उपस्थिती होती.   
 
पुढे बोलताना आठवले म्हणाले, सध्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज असून शिवसेना त्यासाठी ठाम भूमिका घेत असली तरी आमचीही शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे अशी भूमिका असून राज्य सरकार तसा विचार करत असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.  मराठा समाजातील काही मागास लोक असून त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे.
 
मात्र, हे आरक्षण ओबीसी व इतर कोट्यातून देता कामा नये, मराठ्यांना आरक्षण देताना ५० टक्क्यांचा कोटा वाढवला तरी चालेल, असे मत आठवले यांनी व्यक्त केले. आम्ही शिवसेनेबरोबर शिवशक्ती-भीमशक्तीसाठी गेलो होतो त्याचा फायदा आज झाला आहे. त्यातूनच काँग्रेसचे सरकार पडल्याचा दावा त्यांनी केला.
 
आज भाजप सरकारला तीन वर्षे होत असताना या तीन वर्षांत सर्व कामे झाली नसली तरी आणखी दोन वर्षांत राहिलेली कामे करू. आज माझे समाजकल्याण खाते मोठे नसले तरी शिवसेनेकडे राज्यातील उद्योग खाते असून या माध्यमातून पैठणमधील एमआयडीसीत उद्योग आणावे त्यासाठी आम्ही मदत करू, असे आश्वासन आठवले यांनी दिले.  सरकारने नुकतेच जीएसटी विधेयक मंजूर  केले. या विधेयकाचा फायदा सामान्यांना होणार असल्याचे आठवले यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अण्णाभाऊ लबडे यांनी केले, तर कार्यक्रमासाठी दिलीप गोटे, एस. ए. निसर्गंध, प्रकाश लबडे, विजय सुते यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...