आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजानचा शेवटचा ‘अशरा’ सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पवित्र रमजान महिन्याचे दोन खंड संपले असून, शेवटचा ‘अशरा’ सुरू झाला आहे. ईदला अवघे आठ दिवस शिल्लक आहेत. रमजानमधील शेवटचा ‘अशरा’ अतिशय महत्त्वाचा असून या दिवसात अल्लाह आपल्या भक्तांवर विशेष कृपादृष्टी करतो. या काळात मुस्लिम बांधव सतत पाच रात्री जागून ‘शब-ए-कद्र’चा शोध घेतात.

शहरातील सर्वच मशिदींमध्ये ‘एहतेकाफ’ सुरू झाला आहे. यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ‘शब-ए-कद्र’मध्ये केलेली प्रार्थना हजार वर्षांच्या प्रार्थनेसमान असते. 21,23,25,27 आणि 29 रमजानमध्ये ही रात्र कधीही येऊ शकते. रोजेदार बांधव या पाच रात्रीत जागरण आणि प्रार्थनेत मग्न राहून ‘शब-ए-कद्र’ शोध घेतात. रमजान महिन्याच्या तिसर्‍या अशर्‍याला ‘नजात’ (मुक्ती) चे सत्रही म्हणतात. 26 वा रोजा संपल्यानंतर ‘शब-ए-कद्र’ चे आयोजन करण्यात येते. विविध मशिदींमध्ये सुरू असलेल्या ‘तरावीह’मध्ये कुराण पठण करण्याचा कार्यक्रम या काळात पूर्ण होतो. या वेळी कुराण पठण करणार्‍यांना सन्मानित करण्यात येते.

एहतेकाफ सुरू : रमजानमधील शेवटच्या अशर्‍यात ‘एहतेकाफ’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रोजेदार बांधव विविध मशिदीत ‘एहतेकाफ’मध्ये बसले आहेत. शरियतमध्ये एहतेकाफ करणे आवश्यक आहे. प्रत्येक मशिदीत कमीत कमी एका नागरिकाने तरी ‘एहतेकाफ’करावे. हे काम थोडेसे कठीण मानले जाते. कारण दहा, तीन किंवा एक दिवस मशिदीमध्ये राहून अल्लाहची इबादत करावी लागते. ‘एहतेकाफ’मध्ये बसलेला रोजेदार बांधव मशिदीच्या बाहेर पडू शकत नाही. अनेक मुस्लिम बांधव स्वखुशीने ‘एहतेकाफ’मध्ये बसलेल्या व्यक्तींची सेवा करतात. प्रेषित मोहंमद पैगंबर (स.) सुद्धा ‘एहतेकाफ’मध्ये बसत असत. मशिदीमध्ये प्रवेश केल्यानंतर फक्त ‘नियत’ केली तरी ‘एहतेकाफ’ होऊ शकतो.