औरंगाबाद - मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सोमवारपासून (30 जून) सुरू होत आहे. रविवारी सायंकाळी चंद्रदर्शनानंतर शहरातील प्रमुख मशिदींमध्ये रमजान सुरू होत असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार सोमवारी पहिला रोजा असेल. पहाटे 4.42 वाजता सहर व सायंकाळी 7.17 वाजता इफ्तार होईल. रविवारी सायंकाळी विविध मशिदींमध्ये 8.30 वाजता तराहवीची नमाज अदा करण्यात आली.
मुस्लिम बांधवांनी एकमेकांना भेटून, फोनद्वारे रमजानच्या शुभेच्छा दिल्या. रमजानच्या महिन्यात सर्वच मशिदींमध्ये तराहवीच्या नमाज पढली जाते. नोकरदार वर्ग आणि व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन तराहवीची नमाज प्रत्येक मशिदींमध्ये दररोज दीड पारा, तीन पारे, सहा पारे याप्रमाणे पढण्यात येत आहे. यासाठी खास हाफिजची नियुक्ती करण्यात येते. संपूर्ण कुराण ऐकण्यास मिळत असल्याने रमजान महिन्यात तरावीहच्या नमाजसाठी मोठय़ा प्रमाणावर गर्दी होते. यासाठी मशिदींमध्ये विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. पाऊस आल्यास भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मशिदीजवळ शेडही उभारण्यात आले आहेत. शहागंज, रोशन गेट, कटकट गेट, चंपा चौक, बुढीलेन, किराडपुरा, सेंट्रल नाका आदी भागात फळे व खाद्यपदार्थांची दुकाने थाटली आहेत.