आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत रमजानची तयारी जोरात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - इस्लाममध्ये पवित्र समजल्या जाणार्‍या रमजान महिन्यास 21 जुलैपासून सुरुवात होत आहे. त्यासाठी मुस्लिम बांधवांनी तयारी सुरू केली आहे. शहरातील अनेक मशिदींची डागडुजी, परिसराची साफसफाई, रंगरंगोटी आणि रोषणाई के ली जात आहे. तसेच मुस्लिम बांधवांनी घरांची रंगरंगोटीही सुरू केली आहे. व्यापारी, फळ, भाजीपाला विक्रेतेही रमजानचे नियोजन करत आहेत.
रमजानमध्ये शहरातील सर्वच मशिदींमध्ये विशेष नमाज ‘तरावीह’चे आयोजन करण्यात येते. या विशेष नमाजची पूर्वतयारी मशीद प्रशासनाकडून केली जात आहे. मशीद कमिटीच्या बैठका घेऊन ‘तरावीह’ नमाज अदा करण्यासाठी इमामांची नियुक्ती केली आहे. काही मशिदींत एक तर काहींमध्ये दोन-दोन इमाम तरावीहची नमाज पठण करण्यासाठी नियुक्त केले जातात. काही मशिदींमध्ये तरावीहच्या नमाजदरम्यान कुराण पठणही केले जाणार असून हे इमाम कुराणचा अर्थही समजावून सांगणार आहेत.

जीवनशैली बदलणार - रमजान महिन्यात आबालवृद्ध उत्साहाने आणि धार्मिक वृत्तीने रोजा ठेवतात. या महिन्यात खाणपानाच्या सवयींपासून ते झोपेपर्यंत कामाच्या वेळेत बदल केला जातो. व्यापारीसुद्धा त्यांच्या व्यापाराच्या वेळेत बदल करतात. हॉटेल्स, खद्यपदार्थांची दुकाने यांचे वेळापत्रक रोजाच्या वेळेनुसार बदलते. एवढेच नव्हे तर टीव्ही, सिनेमा पाहण्याच्या वेळेतही घट होते. बहुसंख्य मुस्लिम रमजानमध्ये टीव्हीवरील कार्यक्रम किंवा सिनेमा पाहण्याचे टाळतात. या पवित्र महिन्यात बयान, नाअत, कुराण आदींच्या ध्वनिफिती मोबाइलवर डाऊनलोड करून ऐकल्या जातात.
मेजवानीसाठी आंबाही उपलब्ध - मागील वर्षी रमजानला 2 ऑगस्टला सुरुवात झाली होती, परंतु या वर्षी 21 जुलै रोजी सुरुवात होत असल्याने 15 व्या रोजापर्यंत इफ्तारसाठी फळांचा राजा आंबाही उपलब्ध राहणार असल्याचे फळ व्यापारी तसेच महाराजा किशनप्रसाद व्यापारी विकास असोसिएशनचे अध्यक्ष मुजीब खान यांनी सांगितले. पुढच्या रमजानमध्येही पूर्ण महिना आंब्याचा स्वाद घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आलुबुखारा, नसपतीसारखी फळेही इफ्तारसाठी उपलब्ध राहणार आहेत.
खाद्यपदार्थांची अँडव्हान्स बुकिंग - रमजान महिन्यात रोजा इफ्तारसाठी सर्वात जास्त पेंडखजुराला मागणी असते. तसेच पपई, काकडी, टरबूज, डाळिंब, अननस, केळी आदी फळे खरेदीसाठी फळ विक्रेत्यांनी अँडव्हान्स बुकिंग सुरू केली आहे. फराळाच्या अनेक पदार्थांचा साठा केला जात आहे.
महागाईचा प्रभाव - वाढत्या महागाईचा या वर्षी रमजानवर परिणाम दिसणार आहे. फळे, भाजीपाला आणि विविध खाद्यपदार्थांच्या भावात मागील वर्षीपेक्षा वाढ झालेली आहे. या वर्षी काही फळांच्या किमतीत दुप्पट व तिपटीने वाढ होण्याची शक्यता फळ व्यापारी मुजीब खान यांनी व्यक्त केली. घरीही विविध खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणारे तेल, बेसन, कांदा, मिरची, पालक आदी वस्तूही महाग झाल्या आहेत.