आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामकृष्णबाबांसह माजी आमदार वाणींचे घवघवीत यश, वैजापूर बाजार समितीत मिळवला विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - तालुक्यातील सहकार क्षेत्रातील पीक उत्पादक शेतकऱ्याच्या हिताची महत्त्वपूर्ण संस्था असलेल्या तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर सलग तिसऱ्यांदा एकहाती वर्चस्वाची राजवट प्रस्थापित करण्यात काँग्रेसचे माजी खासदार व शिवसेनेच्या माजी आमदारांनी घवघवीत यश संपादन केले.

दरम्यान दोन मातब्बर अनुभवी नेत्यांनी संचालक मंडळाच्या निवडणुकीत विरोधी बाजुच्या काँग्रेस व राष्ट्रवादी मधील दोन विद्यमान आमदारांच्या जोडगोळीच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या पॅनलचे आव्हान भुईसपाट केले. सोमवारी निवडणुकीच्या मतमोजणीत अंतिम निकालात दहा विरुध्द आठ या फरकाने शिवशाही विकास पॅनलने संस्थेवर बहुमताचा शिक्कामोर्तब केला. मतमोजणीत निकालात ग्रामपंचायतीच्या अनुसुचित जाती व सोसायटीच्या महिला राखीव मतदार संघात अंत्यत चुरशीची रंगतदार लढत झाली. बाजार समितीच्या सत्तासंघर्षाच्या टोकदार निवडणूक लढतीत दोन्ही पॅनलमधील उमेदवारात अटीतटीच्या लढतीत सोसायटी मतदार संघातील एकूण अकरा जागापैकी सेना पुरुस्कृत शिवसेनेच्या शिवशाही पॅनलचे आठ उमेदवार विजयी झाले.तर आघाडीच्या शेतकरी विकास पँनलचे तीन उमेदवारांना यश मिळाले. राजकीय अस्तितत्व व प्रतिष्ठेच्या तोलामोलाच्या लक्षवेधी ठरलेल्या बाजार समितीच्या १८ सदस्यीय संचालक मंडळ निवडीसाठी रविवारी शांततेत मतदान पार पडले. सहकार क्षेत्रातील महत्वपूर्ण निवडणूक लढतीतून भाजपाने माघार घेतल्याने त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह दोघांनी क्षणात कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत शिरकाव केला. या निवडणुकीत कॉग्रेसचे माजी खासदार रामकृष्ण पाटील व शिवसेनेचे माजी आमदार आर.एम.वाणी यांच्या नेतृत्वाखालील शिवशाही शेतकरी विकास पँँनल तर आ. सुभाष झाबंड,आ. भाऊसाहेब चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, मनसेचे जिल्हाध्यक्ष कल्याण दांगोडे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलमध्ये सरळ लढत रंगली होती.
निवडणुकीत दोन्ही पॅनलच्या प्रमुख नेत्यांनी सक्रीय सहभागामुळे निवडणुक अटीतटीची झाली. तरुण आमदारांनी निवडणूक प्रचारात माजी खासदार रामकृष्ण पाटील यांची पक्षनिष्ठा, व “बंद पडलेल्या संस्था पुन्हा कार्यान्वित करण्याचे तंञ माजी आमदार आर.एम.वाणीना अवगत” असल्याच्या वक्तव्यावर आरोप प्रत्यारोपाची मोठी राळ उडाली होती. मागील संचालक मंडळाने केलेल्या नोकरभरतीवर मात्र दोन्हीकडील बाजूने अळीमिळीची भूमिका घेण्यात आली.

व्यापारी-हमाल मतदारसंघात आघाडीचे वर्चस्व...
व्यापारी मतदारसंघातील दोन जागेवर आघाडीचे ज्येष्ठ उमेदवार सुरेश तांबे यांनी सर्वाधिक मते मिळवत संचालकपदाची हॅट््ट्रिक साधली. त्यांच्यासोबत कैलास बोहरा यांनीही यश मिळवले. हमाल मापाडी मतदारसंघातून बाबासाहेब गायकवाड विजयी झाले.

डोंगरथडी भागाचा दबदबा
बाजार समिती संचालक मंडळ निवडणूक निकालात मतदारांनी दोन्ही पॅनलमधील डोंगरथडी भागातील तब्बल नऊ उमेदवारांना विजयाचा कौल दिला हे विशेष.
बातम्या आणखी आहेत...