आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाणाने नव्हे, फटाका उडून रावणदहन, रामलीला मैदानावर नागरिकांची अलोट गर्दी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ढोल-ताशांचा गजर अन् फटाक्यांच्या आतषबाजीने शुक्रवारी रावणदहन झाले. सिडको एन-7 मधील रामलीला मैदानावर नागरिकांची अलोट गर्दी होती. विशेष म्हणजे दरवर्षी बाण मारून रावणदहन करण्यात येते, परंतु यंदा आतषबाजी करताना फटाका उडून पडल्यामुळे पुतळ्याचे दहन झाले. सायंकाळी 7 वाजता येथील कार्यक्रम नियोजित होता, परंतु 6.30 वाजताच पुतळा जळाल्यामुळे नंतर आलेल्या लोकांचा हिरमोड झाला.
दुपारी चार वाजेपासूनच नागरिक मैदानावर जमत होते. दरवर्षीप्रमाणे गर्दी होईल म्हणून पोलिसांचाही येथे मोठा बंदोबस्त होता. या वेळी सर्वजण एकमेकांना विजयादशमीच्या शुभेच्छा देत होते. सात वाजता कार्यक्रम होणार म्हणून अगोदरपासून वातावरणनिर्मिती केली जात होती. तितक्यात तीन जणांनी फटाक्यांची लड लावली अन् त्यातील एक फटका उडून रावणाच्या पुतळ्यात घुसला. काही कळण्यापूर्वी अवघ्या काही मिनिटांतच पुतळ्याचे दहन झाले. उद््घाटनाची फीत व बाण मात्र तसेच राहिले. अलहाबाद मिर्झापूर येथून राम, लक्ष्मण, हनुमान, रावण यांची भूमिका सादर करणारे कलाकार येथे आणण्यात आले होते. त्यांनी जिवंत देखावा सादर केला. याचबरोबर उंच उडणाऱ्या पॅराशूटनेही आनंदात भर घातली.
भरला राजकीय मेळा
सध्या विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू असल्याने शहरातील सर्व पक्षांचे उमेदवार आणि स्थानिक नेते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. राजेंद्र दर्डा, अतुल सावे, महापौर कला ओझा, किशनचंद तनवाणी, शेखर देसरडा, संघाचे अध्यक्ष एल. एन. शर्मा, बच्चुसिंग लोधी, ओमीराम पटेल, विनोदकुमार दीक्षित, आर. एस. गुप्ता, विश्वनाथ स्वामी, नगरसेवक काशीनाथ कोकाटे यांनी येथे उपस्थिती लावली. आचारसंहिता आहे. थांबणे बर नव्हे, असे नागरिकांशी बोलून दर्डा रावणदहनापूर्वीच निघून गेले.