आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजान आणि मानवता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईशभय एक असा पाया आहे ज्यावर एक शांततापूर्ण समाज, एक यशस्वी व्यवस्था आणि आदर्श मानवतेची स्थापना आणि शाश्वती अवलंबून आहे. पवित्र कुराणात मनुष्याच्या ठायी हेच ईश्वराचे भय उत्पन्न करणे. हा रोजाचा खरा उद्देश दाखविण्यात आला आहे. कुराण (2:183 )


ईश्वराची प्रत्येक क्षणी, कोणत्याही ठिकाणी, दिवसरात्री, सर्वांसोबत किंवा एकटेपणात सुद्धा मनुष्याच्या प्रत्येक चांगल्या-वाईट कृत्यावर दृष्टी असल्याची जाणीव आणि विश्वास पक्का होतो. रोजाद्वारे महिनाभर प्रत्येक दिवशी दहा ते चौदा तास रोजेदारास जाणीव आणि विश्वास दृढ करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. माणसात माणुसकीचा असा गुण निर्माण केला जातो. जो वाईटाशी, अत्याचाराशी आणि भ्रष्टाचाराशी स्वत: आपल्या र्मजीने संघर्ष करून वाचू शकेल.

मानवाबरोबर आपुलकी,संयम, क्षमा, सेवा आणि बंधुभावाने चांगले वागावे अशी सर्वसामान्य शिकवण इस्लामने अनुयायांना दिली आहे. या सर्वोकृष्ट शिकवणीस आचरणात आणण्यासाठी रमजान महिन्यात विशेष भर दिला आहे. या महिन्यात केलेल्या भल्या कामाचा मोबदला मरणोत्तर जीवनात सामान्य दिवसांच्या तुलनेत सत्तर पटीने अधिक मिळेल. रमजानमध्ये जास्तीत जास्त चांगले काम करून ईशप्रसन्नता प्राप्त करण्याचा प्रयत्न रोजेधारकांकडून केला जातो. याचा लाभ असा देखील होतो की रमजाननंतरसुद्धा लोक चांगली (नेक ) पुण्यप्रद कामे करण्याचा प्रयत्न करत असतात.

रोजाच्या माध्यमातून मनुष्याला नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या वाईट व अनिष्ठ बाबींपासून वाचण्याचे देखील प्रशिक्षण दिले जाते. महंमद पैगंबरांनी म्हटले आहे की ‘ज्याने रोजा पालन करून खोटे बोलणे सोडले नाही, तर मग अल्लाहास त्याच्याशी काही मतलब नाही. तो फक्त दिवसभर भुकेला-तहानलेला राहिला. रोजा केल्याने शिव्याशाप, संताप, भांडण-तंटा, एखाद्याच्या पाठीमागे दूषणे, निंदानालस्ती, एखाद्यावर खोटा आळ किंवा आरोप, एखाद्याचा अपमान यासारख्या वाईट सवयींपासून लांब राहण्याचे बळ आणि क्षमता वाढते. सुखसंपन्न आणि र्शीमंत लोकांनी रोजाचे पालन केल्यावर गरीब, वंचित त्रस्त आणि दुरवस्थेत असलेल्या लोकांना भूक कशाप्रकारे सतावते. अस्वस्थ करते याची जाणीव होते . यामुळे सुखी लोकांच्या मनात गरीब आणि वंचितांविषयी सहानुभूतीची भावना निर्माण होते. समाजातील दीनदु:खी व दरिद्री लोकांसोबत धनवान आणि प्रतिष्ठित लोकांचा संबंध जोडून ठेवणे. तसेच त्यांच्याशी आपलेपणा, सहानुभूती आणि हितचिंतक बनून चांगले काम करण्याचे प्रशिक्षण रमजानमध्ये दिले जाते. यासाठी जर एखादा मनुष्य अगतिकतेमुळे नाइलाजास्तव रोजा ठेवू शकत नसल्यास त्याने शरीअतच्या (इस्लामी धर्मशास्त्र) आदेशाप्रमाणे नंतर रोजा पूर्ण करावा किंवा बदलाच्या स्वरूपात एका गरिबास भोजन खाऊ घालावे. अगतिकतेशिवाय एक रोजासुद्धा सोडून दिल्यास अशा अवस्थेत एका रोजाच्या बदल्यात त्याला साठ रोजे ठेवावे लागतील किंवा साठ गरीब व वंचितांना जेऊ घालावे लागेल.

एक महिना रोजे पूर्ण केल्यानंतर ईदची नमाज कृतज्ञता आणि आनंदाप्रीत्यर्थ अदा केली जाते. इस्लामी शिकवणीनुसार या नमाजपूर्वी घरातील प्रत्येक व्यक्ती लहानथोर, स्त्री-पुरुष सर्वांकडून एक ठरावीक रक्कम अथवा सामान गरिबांना व वंचितांना देणे अनिवार्य आहे. याशिवाय त्या व्यक्तीचे रोजे अल्लाहजवळ कबूल होणार नाहीत. ईदच्या दिवशी कोणी आनंद साजरा करण्यापासून किंवा गोडधोड खाण्या-पिण्यापासून वंचित राहू नये. यासाठी अल्लाहने ही आज्ञा दिली आहे.

संकलन: नौशाद उस्मान