आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुबारक, ईद मुबारक: ईद-उल-फित्र उत्साहात साजरी; शिरखुर्म्याचा लुटला आनंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पवित्र रमजान महिन्यात कडक उपवास केल्यानंतर मंगळवारी मुस्लिम बांधवांनी उत्साहात ईद-उल-फित्र साजरी केली. सकाळी 9.30 वाजता छावणीतील ईदगाहमध्ये नमाज अदा केल्यानंतर सर्व जण एकमेकांना ‘‘मुबारक, ईद मुबारक’’ अशा शुभेच्छा देत होते. नातेवाईक, मित्रमंडळींना भेटण्यासाठी अनेक जण रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहन घेऊन विविध भागांत जात होते. त्यामुळे बाजारपेठ बंद असली तरी रस्त्यांवर मात्र वाहनांची रेलचेल होती. शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांच्या घरी आलेल्यांनी शिरखुर्मा आणि शेवयांचा मनमुराद आनंद लुटला. कडक उपवास आणि अपार श्रद्धेने पार पाडलेल्या रमजानच्या महिन्याचे फलित कालच्या चंद्राच्या दर्शनाने झाल्याची भावना मुस्लिम बांधवांनी व्यक्त केली. दिवसभर भेटीगाठी घेतल्यानंतर अनेकांनी सायंकाळी उद्यान तसेच खुलताबादच्या दर्ग्याला दर्शनासाठी जाणे पसंत केले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. छावणीतील ईदगाहमध्ये सकाळी 9.30 वाजता, तर उस्मानपुरा ईदगाहमध्ये सकाळी 10 वाजता नमाज अदा करण्यात आली. छावणीतील ईदगाहवर मुख्य नमाज झाल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, माजी मंत्री गंगाधर गाडे, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, सुभाष झांबड, राष्‍ट्रवादीचे सुधाकर सोनवणे पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

सर्वधर्मीयांनी दिल्या शुभेच्छा
ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी शहरातील सर्वधर्मीय लोक सरसावले होते. शुभेच्छा संदेशांनी मुस्लिम बांधवांचे मोबाइल दिवसभर खणखणत होते, तर अनेक जण प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देऊन शिरखुर्म्याचा आनंद घेत होते.