औरंगाबाद - भांगसी गडावर मित्रांसोबत दर्शनासाठी गेलेल्या दोन तरुणींवर चाकूचा धाक दाखवून पाच नराधमांनी पाशवी अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. सोबतच्या दोन तरुणांसह तरुणींना बेदम मारहाण करून नराधमांनी कुकर्म केले. पहाटेपर्यंत धरपकड करत पोलिसांनी पाचही जणांना गजाआड केले. ओळखपरेडसाठी त्यांना 21 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे.
मूळ अमरावती जिल्ह्यातील मोझरी (ता. तिवसा) येथील सारिका (20) आणि राखी (21, दोघींची नावे बदलली आहेत) वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरीस आहेत. त्यांचे आयटीआय झालेले असून, वाळूजमध्ये त्या छत्रपतीनगरात भाड्याने राहतात.
सुटी असल्याने शुक्रवारी दोघींनी कंपनीतील सहकारी रोहित (22) आणि सूरज (22, दोघांची नावे बदलली आहेत) यांना फोन करून भांगसी गडावर जाऊ असे सांगितले. दुपारी 2.15 वाजता रोहित व सूरज मोहटादेवी मंदिराजवळ होते. दोघींना त्यांनी साजापूर तलावाजवळून सोबत घेतले. चौघेही पायीच गडावर आले. परतताना 5.30 वाजता सुभाष सुखदेव जाधव (21, करोडी, विवाहित) त्यांच्याजवळ आला. ‘आता मंदिर बंद झाले, गडाच्या मागच्या रस्त्याने घरी जा’ असे त्याने सांगितले. त्यामुळे चौघे साजापूरच्या रस्त्याने निघाले. तेवढ्यात सुभाष दुस-या मार्गाने पुन्हा समोर आला. पुढे चाललेल्या रोहित व सारिकाला अडवून त्याने त्यांना मारहाण केली. तेवढ्यात मागे पडलेले सूरज व राखी धावतच आले. तेव्हा नाल्यालगतच्या दोन खड्ड्यांतून चौघे जण बाहेर आले. ‘तुम्ही इथे कशाला आलात?’ असे म्हणत त्यांनी चौघांना मारहाण सुरू केली. नंतर बांधकाम गुत्तेदार सुभाष भाऊसाहेब बडोगे (32, जोगेश्वरी) याने चाकूच्या धाकावर राखीला, तर सुभाष जाधवने सारिकाला फरपटत दूर नेले, तर मजूर अनिल कांतीलाल उबाळे (20, करोडी, अविवाहित), मजूर ठेकेदार शेख शाहरुख शेख लतीफ (21, रा. करोडी, अविवाहित) आणि मजूर शेख मुश्ताक शेख मुसा (30, रा. साजापूर, विवाहित) यांनी रोहित व सूरजला दाबून धरले. खड्ड्यात ओढून दोघींच्या तोंडात रुमाल कोंबला व आळीपाळीने अत्याचार केले. 5.30 ते 6.45 असा सव्वातास हे अत्याचार सुरू होते. तरुणी जिवाच्या आकांताने आरडाओरड करत होत्या. मात्र, निर्मनुष्य ठिकाण असल्याने मदतीसाठी कोणीही आले नाही. घटनेनंतर पाचही नराधमांनी तेथून पळ काढला. 20 मिनिटे दोघी बेशुद्धावस्थेत होत्या. रात्री 10.30 च्या सुमारास याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात 376 (ड), 341, 323, 506 कलमान्वये गुन्हा दाखल झाला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील करत आहेत.
तरुणींना रुग्णालयातून डिस्चार्ज
तरुणी आणि आरोपींचे कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यांच्या मोबाइल टॉवरचे लोकेशन, स्वॅब गोळा करण्याचे काम सुरू आहे. तरुणींना घाटी रुग्णालयात वॉर्ड क्र. 29 मध्ये दाखल करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी त्यांना डिस्चार्ज मिळाला.
पहाटेपर्यंत धरपकड, पाचही नराधमांना अटक
पाचही आरोपी अनोळखी होते. सुभ्या, अन्या अशी हाक ते एकमेकांना मारत होते. त्यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिस उपायुक्त जय जाधव, सहायक आयुक्त सुखदेव चौगुले, निरीक्षक ज्ञानोबा मुंडे, उपनिरीक्षक प्रकाश दांडगे, वाळूज एमआयडीसीचे उपनिरीक्षक नरहरी शिंदे यांच्यासह पथकाने रात्री साडेदहा ते पहाटे 6.30 दरम्यान आरोपींना पकडले.
सरपंच मदतीला धावले
घटनेनंतर तरुणींना धीर देत तरुण पायीच साजापूरकडे निघाले. रस्त्यात साजापूरचे सरपंच कलीम पटेल भेटले. तरुणींची अवस्था पाहून त्यांनी चौकशी केली. पटेल यांनी रिक्षाने त्यांना छावणी ठाण्यात आणले.
मनोधैर्य योजनेचा लाभ
पोलिसांनी लगेच आरोपी पकडले. हे उल्लेखनीय आहे. मनोधैर्य योजनेचा तत्काळ लाभ मिळण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांच्याशी बोलणार आहे.’
ज्योत्स्ना विसपुते, सदस्या, राज्य महिला आयोग
बलात्कार व लुटारुंचा गड
भांगसी माता गडावर सुरक्षा व्यवस्था नसल्यानेया ठिकाणी नेहमी बलात्कार आणि लूटमारीच्या घटना घडतात. या वर्षभरात घडलेली ही तिसरी घटना आहे.