आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INTERVIEW : काही जण निवडणुकीपुरतेच पक्षात येतात आणि जातात - रावसाहेब दानवे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पूर्वी कोणत्याही पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी होती. मात्र, बदलत्या परिस्थितीत भाजप असो वा इतर कोणताही पक्ष, आता येणारे कार्यकर्ते निवडणुकांपुरतेच उरले आहेत. असे असले तरी आम्हाला त्याची चिंता नसल्याचे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले. "दिव्य मराठी'च्या ‘गप्पा डावपेचांच्या’ या सदरात त्यांनी संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला. महापालिकेच्या निवडणुकीनंतर २५ माजी आमदार पक्षात आणणार असल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
श्रीकांत सराफ : युती झाली तरी कार्यकर्त्यांचे मनोमिलन झालेले दिसत नाही...

पूर्वीच्या निवडणुकीत कार्यकर्ता अनेक वर्षे वाट पाहत असायचा. उमेदवारी नाही मिळाली तरी तो वाट पाहायचा. मात्र, आता ही परिस्थिती राहिलेली नाही. आता कार्यकर्ते दुसऱ्या निवडणुकीपर्यंत वाट पाहत नाहीत. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात असा त्यांचा प्रवास सुरूच असतो. त्यामुळे आम्ही तिकिटांसाठी आलेल्या बंडखोरांना काढून टाकू.
मंदार जोशी : भाजपने अनेकांना पक्षात घेतले, बाहेरच्यांना का घ्यावे लागले?

राजकारणात पक्ष वाढवायचा असेल तर भरती करावी लागते. मात्र, आम्ही ज्यांना पक्षात घेतले त्यांना आमिष दाखवले नाही. काहींचे समाधान केले. ज्या वॉर्डात आमच्याकडे कुणी नव्हते तेथे बाहेरून आलेल्यांना संधी दिली. काही जणांना उमेदवारी देणे अजिबातच शक्य नव्हते. त्यांनी बंडखोरी केली. त्यांना माघारीची विनंती केली. बघूयात काय होतंय ते.

सतीश वैराळकर : जालना जिल्हा आणि भोकरदन विधानसभा मतदारसंघाशी संबंधित लोकांनाच उमेदवारी दिल्याची चर्चा सुरू आहे...

असे अजिबात नाही. ज्यांनी पक्षाचे काम अनेक वर्षांपासून केलेले आहे त्यांनाच तिकीट दिले आहे. एखाद्याची पार्श्वभूमी संबंधित जिल्ह्याची असू शकते किंवा त्यांचे आजोबा जालना जिल्ह्याचे असले म्हणून त्यांच्यावर अन्याय करायचा का?

हरेंद्र केंदाळे : कोअर कमिटीतील सदस्याच्या नातेवाइकांनी बंडखोरी केल्यास काय संदेश जातो?

बंडखोरांवर कारवाई करण्यात येणार आहे. किशनचंद तनवाणी यांच्या भावावरदेखील कारवाई करण्यात येईल. बंडखोरांना थारा देणार नाही.
शेखर मगर : केंद्रीय मंत्री असताना मराठवाड्यासाठी अनेक कामे करू शकला असता. आता प्रदेशाध्यक्ष झाल्याने विकासात मागे पडू...

मंत्री नसलो तरी सत्ताधारी पक्षाचा मी अध्यक्ष आहे. डीएमआयसीसाठी केंद्राने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. ड्रायपोर्ट जालन्याजवळ होत आहे. त्यासाठी ५०० एकर जागादेखील घेतली आहे. औरंगाबाद, जळगाव, पैठण या रस्त्यांची काही लोकांनी अगोदरच उद््घाटने केली. त्यांची अजून वर्कऑर्डर निघालेली नाही. माझ्या मतदारसंघातील ही कामे आहेत. ती मी पूर्ण करणार आहे. धुळे-सोलापूर महामार्ग होत आहे. त्याचे भूसंपादन रखडले असले तरी ते तातडीने पूर्ण करणार आहोत. शहरातील रस्त्यांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी आणला आहे. त्यामुळे मंत्री नसलो तरी ही कामे होत आहेत. त्यात माझा वाटा महत्त्वाचा आहे.
सतीश वैराळकर : सोलापूर-जळगाव प्रस्तावित रेल्वेमार्गाबाबत तुमची भूमिका कायम वादग्रस्त का राहिली?

अजिबात नाही. तुम्ही माझी एखादी भाषणातली क्लिप काढून दाखवा की मी जिथे वेगळी भूमिका घेतली आहे. एखादा मार्ग तयार करताना त्याचा सर्व्हे केला जातो. त्यामुळे तो कुणाच्या सांगण्यावरून बदलला जात नाही. तुम्ही माझी वेगळी भूमिका असल्याची क्लिप दाखवली तर मी राजकारण सोडून देईन. उलट अशा वेळी गुपचूप राहणेच योग्य आहे. दोन्ही बाजंूच्या नागरिकांना मार्ग हवा असतो. त्यामुळे एखाद्या वेळी लोकप्रतिनिधी म्हणून आमची अडचण होते.
संतोष देशमुख : जनशताब्दी एक्स्प्रेस जालन्यापासून सुरू करत आहात?

होय. ती जालन्यामधून सुरू होणार आहे. त्यासाठी कामदेखील सुरू झाले आहे. मात्र, औरंगाबादमधून जाताना तिची वेळ बदलली जाणार नाही. आम्ही जालन्यातील लोकांना सांगितले आहे की तुम्ही लवकर या. त्यामुळे ती जालन्यापर्यंत आली तर तिचा फायदा दुसऱ्या जिल्ह्यालादेखील होईल.
रोशनी शिंपी : औरंगाबादकरांचा त्याला विरोध आहे. शहरातल्या लोकांना आरक्षण मिळणार नाही, त्यामुळे डबे जोडण्याची मागणी होत आहे...

औरंगाबादचे कोणतेही नुकसान होणार नाही. त्यासाठी जनशताब्दीला वेगळे डबे जोडले जातील.
महेश देशमुख : एमआयएम हे काँग्रेसचे पिल्लू असल्याचे बोलले जाते...

मुळात हे काँग्रेसचेच म्हणजे अशोक चव्हाणांचे पिल्लू आहे. चव्हाणांनी त्यांना नांदेडमध्ये पहिल्यांदा महापालिकेत आणले. मात्र, लोकसभेच्या वेळी त्यांनी या पिल्लाचा वापर केला. आता विधानसभा आणि औरंगाबाद महापालिकेत ते त्यांच्या अंगावर आल्यामुळे त्यांना अवघड वाटतेय.
परवेज खान : युती करायची नाही असे ठरले होते, मात्र असे काय घडले की दानवेंना पक्षश्रेष्ठींचा फोन आला आणि युती झाली?

प्रत्येक राजकीय पक्ष दोन पावले पुढे टाकत असतो. उद्धव ठाकरे यांनी आम्ही भाजपशी युती करण्यास तयार आहोत, अशी भूमिका पहिल्यांदा घेतली. ते सर्वत्र छापूनही आले. त्यामुळे त्यांनी अशी भूमिका घेतल्यानंतर आम्हाला वेगळी भूमिका घेणे शक्य नव्हते. त्यामुळे मीदेखील मातोश्रीवर गेलो होते. सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर स्थानिकांना अधिकार देत युतीचा निर्णय घेण्यात आला. आम्ही युती केली नसती तर मग लोकांत संदेश गेला असता की शिवसेनेने पुढाकार घेतला अन् आम्ही त्याला प्रतिसाद दिला नाही.
विद्या गावंडे : भाजप शिस्तबद्ध पक्ष, अशी ओळख असताना बाहेरच्या पक्षातले लोक घेतल्यामुळे तुमची इमेज खराब होत आहे का ?

पक्षाची ताकद वाढवण्यासाठी बाहेरचे लोक घ्यावे लागतात. यामध्ये रेकॉर्ड खराब नाही हे पाहून पक्षात घेतले जाते. जिंतूर मतदारसंघात आमचा कोणीच माणूस नाही. तिथे चहा प्यायलादेखील आम्हाला जागा नाही. मग अशा ठिकाणी माजी आमदार यायला तयार असतील तर का नाही घ्यायचे? पाथरी मतदारसंघातही आमची तीच स्थिती आहे. आमची ताकदच नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये आमची काहीच ताकद नाही. या ठिकाणी माजी आमदार कांबळे येणार असेल तर त्याला का घेऊ नये? आमच्याकडे असे २५ माजी आमदार आहेत. पक्षवाढीसाठी आम्ही त्यांना घेणार आहोत. मनपा निवडणुकीनंतर त्याची प्रक्रिया सुरू होईल.

अरुण तळेकर : जशी शिवसेना अंगावर आली तसे वाटते का?

आमचे आता जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राजकीय मैत्री चांगली झाली आहे. आम्ही आता रात्रीदेखील एकत्र बसतो. त्यामुळे तुम्ही ओळखून घ्या की आमची मैत्री किती चांगली झाली आहे ते.
सतीश वैराळकर : आपण २३ पैकी २२ निवडणुका आतापर्यंत जिंकल्या, सर्वात अवघड कुठली वाटली?

ग्रामपंचायत आणि नगरपालिका. मी पहिल्यांदा ग्रामपंचायतीची निवडणूक लढलो. त्याला घरच्यांचा विरोध होता. निवडणुका लढवणे आमचे काम नाही, अशी आमच्या आजोबांची भूमिका होती. आमच्याकडे जवखेडा (बुद्रुक), खुर्द व पळसखेडा या तिन्ही गावांत मिळून निवडणुका बिनविरोध होत असत. मात्र, मी अर्ज भरला. माझ्या आजोबांनी माझ्याविरोधात प्रचार केला. मी प्रचार करत राहिलो. त्यानंतर लोकांनीच आजोबांना सांगितले की हा निवडणूक हरला तर तुमचेच नाक कापले जाईल. मात्र, निवडणुकीच्या अगोदरच माझा राजीनामा लिहून घेण्यात आला. निवडून आल्यानंतर मी मात्र माझा राजीनामा दिलाच नाही.
प्रवीण ब्रह्मपूरकर : मनपासाठी वॉर्डातही तुम्हाला इतर ठिकाणचे लोक घ्यावे लागतात. मात्र, त्यांना तिकिटे मिळाली नाहीत...

वॉर्डात काही बदल होत असतात. त्यामुळे ज्या वॉर्डात काही प्रबळ लोक होते त्यांनी प्रवेश घेतला. अनेकांना तिकिटे दिली. त्यामुळे इमेज खराब होण्याचा प्रश्नच नाही.
सतीश वैराळकर : लोकसभेत मिळालेले मताधिक्य विधानसभेत घटले, हा सत्तार-दानवे मैत्रीचा परिपाक आहे का?

मुळात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मला प्रथमच सिल्लोडमधून मताधिक्य मिळाले. सिल्लोडला आमचा कार्यकर्ता सुरेश बनकर याला मी संधी दिलेली आहे. सिल्लोडच्या सिद्धेश्वर कारखान्याचा तो चेअरमन आहे. सत्तार यांच्याशी आपली मैत्री जरूर आहे, परंतु राजकारणाशी त्याचा काहीएक संबंध नाही.

मनोज पराती : भाजपची भाषणे सारखी जातीयवादी असतात, त्यामुळे त्याचा परिणाम युवा वर्गावर होतो. तुम्हाला काय वाटते?

मोदींची भाषणे तुम्ही पाहिली असतील तर त्यामध्ये तुम्हाला नेहमी ‘सबका साथ सबका विकास’ हे पाहायला मिळेल. त्यामुळेच कौशल्यनिर्मिती करण्यासाठी देशात वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. त्यांना ट्रेनिंग दिले जात आहे. काही लोक बोलत असतात. मात्र, भाजप जातीयवादाचा विचार करत नाही.
मंदार जोशी : इतकी वर्षे सत्ता असतानाही मुस्लिम वॉर्डात भाजपला उमेदवारच मिळाला नाही, ही परिस्थिती का आहे?

सध्या सर्वच मुस्लिम समाजातील ओढा एमआयएमकडे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे केवळ आम्हालाच नाही तर शिवसेनेचीदेखील तीच परिस्थिती आहे. त्यामुळे आमच्याकडे कोणी तिकीट मागायला आलेच नाही.
शेखर मगर : भाजपने शाहनवाज हुसेन व इतरांना उमेदवारी दिली, परंतु मोदी लाटेत ते पडले...

हुसेन विद्यमान खासदार असताना भागलपूरमधून पडले. एकदा पोटनिवडणुकीत निवडून आणले. २०१४ मध्ये पराभूत असताना त्यांना केंद्रात मंत्री केले. त्यामुळे पराभव झाला तर त्यांना निवडून आणले नाही असे होत नाही. आमच्याकडे चांगले मुस्लिम कार्यकर्ते असतील तर त्यांना संधी दिली जाते.
महेश देशमुख : शहरात काँग्रेस-राष्ट्रवादीची स्थिती कशी आहे?

राष्ट्रवादी काँग्रेसला पॅरॅलिसिस झाल्यासारखी त्यांची स्थिती आहे. काँग्रेसचीदेखील तीच अवस्था आहे. त्यामुळे त्यांचे फारसे अस्तित्व दिसणार नाही.
महेश देशमुख : समांतरच्या विरोधात लोकांचा मोठा रोष आहे. युतीमुळे समांतरचा मुद्दा तुम्ही गमावून बसलात का?

समांतर जलवाहिनी ही केंद्राची योजना आहे. केंद्राच्या ठरलेल्या करारानुसार ती योजना होणारच आहे. लोकांना आज पाण्याची गरज आहे. त्यामुळे या योजनेत कितीही अडथळे आले तरी ती योजना पूर्ण करणार आहोत.

श्रीकांत सराफ : पुढच्या काही वर्षांत पाणीपट्टी वीस हजार होणार आहे. मग त्याबाबत काही करणार की नाही?

टोलनाक्याबाबत लोकांना त्रास होत होता. त्यामुळे सरकारने एका फटक्यात ४०० कोटींचे टोलनाके बंद केले. त्यामुळे पुढच्या काळात सरकारला वाटले की कमी पैशात पाणी दिले पाहिजे तर सरकारकडून ते केले जाईल. इतके टोलनाके बंद केले त्यामुळे पाणीपट्टीच्या बाबतीतही त्याचा विचार केला जाईल.

शेखर मगर : शहरासाठी तुमचे व्हिजन काय राहणार आहे?

या शहराला सर्व सुविधा मिळाव्यात अशी आमची इच्छा आहे. डीएमआयसीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. त्यामुळे उद्योग मोठ्या प्रमाणात वाढतील. ड्रायपोर्टच्या माध्यमातून उद्योगाला चालना मिळणार आहे. ज्या ट्रकमधून मुंबईत माल नेण्यासाठी २८ हजार रुपये लागायचे तो माल १४ हजार म्हणजे अर्ध्या किमतीत नेता येणे शक्य होणार आहे. तसेच महामार्गाचे दुहेरीकरण करणे गरजेचे आहे. या शहारासाठी रिंग रोड असला पाहिजे. माझी ती इच्छा आहे. रिंग रोड झाल्यास मरीन ड्राइव्ह झाल्यासारखे वाटेल आणि तुम्ही तिकडे फिरायला जाऊ शकाल.
परवेज खान : सफाईचे काम पंतप्रधानांचे नाही, अशी ओवेसींनी कालच्या सभेत टीका केली...

सफाईची चळवळ आपल्याकडे विनोबा भावे, महात्मा गांधी, मधू लिमये यांनी सुरू केलेली आहे. त्यांना स्वच्छतेचे महत्त्व माहीत नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेची मला कीव करावीशी वाटत आहे.