आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raosaheb Danve News In Marathi, Jalna Lok Sabha Contituncy, Divya Marathi

जालना लोकसभेसाठी दानवे-औताडेंमध्ये सरळ लढत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री - जालना लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज परत घेण्याची मुदत संपल्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात 22 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. मात्र, आघाडीचे विलास औताडे व महायुतीचे खासदार रावसाहेब दानवे यांच्यातच सरळ लढत होत असली तरी आप, बसप व सपा यांचाही प्रभाव डोकेदुखी ठरू शकते. जालना लोकसभा मतदारसंघाची लढत स्पष्ट झालेली आहे. जालना लोकसभा मतदारसंघात एकूण 15 लाख 80 हजार मतदार 22 उमेदवारांचा भाग्य ठरवणार आहेत.
लोकसभेची पुनर्रचना झाल्यानंतर ही दुसरी निवडणूक आहे. जालना जिल्ह्याचे तीन व औरंगाबाद जिल्ह्याचे तीन अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा मिळून नव्या जालना लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली आहे. प्रत्येक वेळी 30 ते 40 हजारांची लीड घेऊन विजयी होणार्‍या रावसाहेब दानवे यांना नव्याने स्थापन झालेल्या जालना लोकसभेने गतवेळी आमदार कल्याण काळे यांच्या रूपाने चाप लावून त्यांची लीड तब्बल 22 हजारांनी कमी केली होती. जालना शहरातच दानवे यांना 15 हजारांची पिछाडी होती. सध्या विकासाच्या मुद्दय़ाऐवजी महायुतीमध्ये सर्वकाही नमो नमो म्हणजेच नरेंद्र मोदींचा नारा आहे. काँग्रेस आघाडी शिक्षणाचा अधिकार, अन्न सुरक्षा कायदा या मुद्दय़ांवर जोर देऊन प्रचारात बाजी मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.


जालना लोकसभा मतदारसंघात सध्या एकूण 22 उमेदवार रिंगणात आहेत. काही उमेदवार केवळ पक्ष जिवंत राहावा म्हणून निवडणूक लढवत आहेत. कोणत्याही पक्षाने महिला उमेदवारास प्राधान्य न दिल्याने लीलाबाई सपकाळ या एकमेव महिला निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. सध्या या मतदारसंघात खासदार रावसाहेब दानवे (भाजप), विलास औताडे (काँग्रेस), दिलीप म्हस्के (आप), डॉ. शरदचंद्र वानखेडे (बसप), संजय हिवराळे (आंबेडकर नॅशनल काँग्रेस) रामभाऊ उगले (महाराष्ट्र लोकशाही आघाडी), कुंजबिहारी अग्रवाल (समाजवादी पार्टी), रमेश राठोड (बहुजन मुक्ती पार्टी), मिर्झा अफसर बेग (वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया), बाबासाहेब शिंदे, प्रतापसिंग महाजन, काकरवाल, अँड. महेश खरात आदी उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात उमेदवारांची भाऊगर्दी दिसत असली तरी खरी लढत मात्र पारंपरिक प्रतिस्पर्धी भाजप व काँग्रेसच्या उमेदवारांतच होणार आहे. तसे पाहता गतवेळी बसपने 35 हजार मते घेऊन काँग्रेसला जेरीस आणले होते. मात्र, सध्या तशी परिस्थिती नाही. आप सध्या फक्त निवडणुकीला उभा आहे, तर सपादेखील ग्रामीण भागात काय करिष्मा करणार, हा कुतूहलाचा विषय आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जालना लोकसभेत उमेदवारच दिला नसल्याने औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील मनसे कार्यकर्ते अस्वस्थ असून ते आता कुणाचा प्रचार करावा यासाठी ‘कृष्णकुंज’च्या आदेशाची वाट पाहत आहेत.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांची नाराजी प्रदेश उपाध्यक्षपद देऊन दूर केली आहे. दानवे यांनी आपली स्थिती मजबूत करत देवगिरी कारखान्याचे चेअरमन डॉ. नामदेवराव गाडेकर व सिल्लोड बाजार समितीचे सभापती र्शीरंग साळवे यांना भाजपात आणून एक प्रकारे काँग्रेसला हादरा दिला आहे. मात्र, त्याचा दानवे यांना कितपत फायदा होईल, हे कोणताच राजकीय नेता बोलायला तयार नाही.


सध्या आघाडीने सर्व विद्यमान आमदारांना प्रचारप्रमुख करून सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली आहे. सध्या पाच विधानसभा व एक विधान परिषद असे सहा आमदार आघाडीकडे आहेत. त्याचा पुरेपूर फायदा करून घेण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असून त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना विक्रमी रॅली काढून त्याची चुणूक दाखवून दिली.