आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपकडून लोकसभेसाठी ‘शांत’पणे बाहेरून चाचपणी; प्रदेशाध्यक्ष दानवे शांतीगिरी महाराजांच्या चरणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - देशातील सर्वात मोठा पक्ष असा दावा करणारा भारतीय जनता पक्ष औरंगाबादेत लोकसभेसाठी बाहेरचा उमेदवार शोधताना दिसतोय. पक्षात कार्यकर्ते मोठ्या संख्येने असले तरी विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना पाठ दाखवणारा कोणी नसल्यामुळे आयत्या उमेदवाराची चाचपणी त्यांनी सुरू केली आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढून दीड लाखावर मते घेणारे वेरूळ मठाचे शांतीगिरी महाराज मौनगिरी यांची मनधरणी पक्षाकडून करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकाच आठवड्यात शांतीगिरी महाराजांची भेट घेऊन चर्चा केली. महाराजांचा नकार आला तर अन्य पक्षातील तिघांचा पर्यायही भाजपने खुला ठेवल्याची चर्चा आहे. 

 

भाजप औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून गेल्या ३० वर्षांत लढलेला नाही. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने त्यांच्याकडे तगडा उमेदवार तयार होऊ शकला नाही. परंतु आता स्वबळाची भाषा सुरू असल्याने त्यांनी उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. भाजपचे जुने नेते, कार्यकर्ते कामाला लागले असले तरी पक्ष नेतृत्वाला त्यांच्या विजयावर भरवसा नाही. त्यामुळेच दुसऱ्या पक्षातील आयत्या उमेदवारांवर नेते लक्ष ठेवून आहेत. 

 

मराठा उमेदवार हवा म्हणून खटाटोप : औरंगाबाद लोकसभा जिंकायची असेल तर मराठा उमेदवार हवा, असे भाजपला वाटते. त्यामुळेच त्यांनी हा खटाटोप चालवला आहे. पक्षात तगडा मराठा नसल्याचे त्यांचे मत आहे. त्यामुळेच ते दुसऱ्याच्या तंबूत डोकावताना दिसतात. 

 

शांतीगिरींकडे लक्ष का? : शांतीगिरी महाराज यांनी २००९ मध्ये अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. ते तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांच्या मागे मठाचे भक्त तसेच मराठा समाज असल्याची कायम चर्चा होते. त्यामुळेच भाजपने त्यांना गळ टाकला आहे. तेव्हाच्या पराभवानंतर ते निवडणूक लढवणार नाहीत, असे त्यांच्या भक्तांनी जाहीर केले होते. त्यामुळे या वेळी ते लढणार की नाही, अशी चर्चा आहे. त्यांनी भाजपकडून निवडणूक लढावी अशी पक्षाची इच्छा आहे. त्यामुळेच धार्मिक सप्ताहाच्या निमित्ताने आधी प्रदेशाध्यक्ष दानवे आणि त्यानंतर ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांची भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केली. त्यात काय ठरले हे स्पष्ट होऊ शकले नाही. तरीही पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शांतीगिरी महाराजांची मनधरणी करण्यात येत आहे. त्यात यश येईल, अशी पक्षाला अपेक्षा आहे. 

 

हे आहेत पक्षाच्या रडारवर 
आमदार सतीश चव्हाण : शांतीगिरी महाराजांनी नकार दिला तर राष्ट्रवादीचे पदवीधर आमदार सतीश चव्हाण भाजपच्या रडारवर आहेत. शैक्षणिक संस्थेच्या निमित्ताने चव्हाण यांचे जिल्ह्यात नेटवर्क आहे. राजकारणातील चांगला चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. मात्र जिल्ह्यात त्यांचे नातेगोते कमी आहे. पक्षाला चांगल्या चेहऱ्याबरोबरच मराठा समाजातील नातेगोते असणारा उमेदवार हवा आहे. निवडणुकीत नात्यांचे नेटवर्क कामी येते, असे त्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीत ते एकटे पडल्याची भावना आहे. 

 

विनोद पाटील : राष्ट्रवादीचे विनोद पाटील यांचाही पक्षाकडून विचार सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी असलेले नातेसंबंध आणि मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात करण्यापासून मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा दिल्याचा फायदा त्यांना होऊ शकतो, असे पक्षाला वाटते. पक्षाला हवे असलेले नात्यागोत्यांचे नेटवर्क मतदारसंघात त्यांच्याकडे आहे. तेही पक्षात बाजूला पडल्याचे चित्र आहे. ते काँग्रेसच्याही रडारवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांना इकडे ओढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. 

 

आमदार हर्षवर्धन जाधव : प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई असलेले कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव हेदेखील ऐनवेळी भाजपचे उमेदवार ठरू शकतात. जाधव हा चर्चेतील चेहरा आहे. नातेगोते तसेच नेटवर्कमध्ये ते पुढे आहेत. जाधव यांना लोकसभा मिळाली तर मुलीला कन्नडमधून आमदार करण्याची प्रदेशाध्यक्ष दानवे यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. 

 

आमच्याकडे तगडे उमेदवार 
आमच्या पक्षाकडे चांगले तगडे आणि मुरब्बी उमेदवार आहेत. केवळ मराठा म्हणून दुसऱ्या पक्षातील उमेदवार शोधण्याची गरज नाही. वैयक्तिक भेटीबद्दल कोणी काहीही चर्चा करू शकते, परंतु तेथे राजकीय चर्चा झालेली नाही. 
- शिरीष बोराळकर, प्रदेश प्रवक्ते, भाजप. 

बातम्या आणखी आहेत...