आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमाच्या मारेकऱ्याला अटक करण्याच्या मागणीसाठी मृतदेह 8 तास होता पडून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करताना पोलिस कर्मचारी. - Divya Marathi
आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करताना पोलिस कर्मचारी.
बनोटी /सोयगाव- हनुमंतखेडा येथील अल्पवयीन मुलगी सीमा रामा राठोड हिच्या निर्घृण हत्याप्रकरणामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी सकाळी घाटी रुग्णालयात मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतर नातलगांनी सीमाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत घाटीतच आराेपींच्या अटकेसाठी ठिय्या आंदोलन केले. दुपारनंतर पोलिसांच्या मध्यस्थीने मृतदेह ताब्यात घेतला. मात्र हनुमंतखेडा येथे समाज भवनाच्या स्टेजवर ठेवून आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. ८ तास मृतदेह पडून राहिला. शेवटी पोलिस अधीक्षक आरती सिंग यांनी आरोपीला अटक करणारच, अशी ग्वाही दिल्यानंतर रात्री साडेनऊ वाजता सीमावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

सीमा राठोड हिच्या हत्येमुळे हनुमंतखेडा व परिसरावर शोककळा पसरली आहे. हनुमंतखेडा येथील सरपंच दादाभाऊ चव्हाण यांनी रविवारी (१६ जुलै) सकाळी विशेष ग्रामसभा घेतली. हनुमंतखेडा येथील सर्व ग्रामस्थ स्व. यशवंतराव चव्हाण चौकात सकाळी ७ वाजेपासून सीमाला न्याय मिळवून देण्यासाठी ठाण मांडून बसले होते. त्यातच गावातील एकाही घरात चूल पेटली नव्हती.   शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी ग्रामसभेत या घटनेचा धिक्कार केला. या घटनेचा तपास  सीबीआयकडे देण्यात येऊन  हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी द्यावे असा ठराव मांडला. याला  ग्रामसभेत सर्वांनी हात उंचावून मंजुरी दिली. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता.

घाटीत नातलगांची गर्दी
सकाळी आठ वाजेपासूनच हनुमंतखेडा येथील सीमाच्या नातेवाइकांनी घाटीत गर्दी केली होती. या वेळी गोरसेनेचे पदाधिकारी व कायर्ककर्तेही उपस्थित होते. त्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी केली. अखेर अपर पोलिस अधीक्षक उज्वला वनकर यांनी घाटीत येऊन नातेवाइकांची भेट घेत  तात्काळ आरोपींना अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

रात्री उशिरा केले अंत्यसंस्कार
सीमाच्या मारेकऱ्यांना अटक होईपर्यंत तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा राठोड कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी घेतल्याने गावात तणवाचे निर्माण झाले होते. त्यामुळे सायंकाळी उशिरा पोलिस अधीक्षक आरती सिंग यांनी शोकाकुल परिवाराची भेट घेऊन आरोपींना अटक करण्याची ग्वाही दिली. रात्री साडेनऊ वाजता सीमाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले
बातम्या आणखी आहेत...