आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेडछाडप्रकरणी असंवेदनशीलता; तक्रार कशाला, रस्ताच बदला...पोलिसांचा फुक्कटचा सल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीत बलात्काराची घटना घडली.. संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले.. महिलांविषयी संवेदनशीलता वाढल्याचे चित्र निर्माण झाले... दुसरीकडे औरंगाबाद शहरात एक विद्यार्थिनी गेल्या अडीच महिन्यांपासून एका मवाल्यामुळे त्रस्त आहे.. विद्यापीठातील वॉर्डन सबुरीचा सल्ला देतात, तर पोलिस महोदय चक्क रस्ता बदलण्याचा ‘मोलाचा आणि फुक्कटचा’ सल्ला देतात. पोलिस आयुक्तांनी मवाल्यांच्या कानफटात वाजवण्याचा सल्ला देऊन मुलींना धीर दिला. मात्र, काही पोलिस असंवेदनशीलतेचे इमले बांधून संपूर्ण यंत्रणेच्याच कानफटात मारत आहेत.

विद्यापीठात शिकणार्‍या एका मुलीला एक मवाली अडीच महिन्यांपासून त्रास देत आहे. तिला रस्त्यात अडवण्याचा आणि गाडीत ओढण्याचा प्रयत्न झाला. धास्तावलेल्या मुलीने विद्यापीठाच्या वॉर्डनकडे तक्रार केली. त्यांच्याकडून दाद मिळाली नाही. त्यानंतर तिने बेगमपुरा पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, तेथे भलताच सल्ला मिळाला. त्यानंतर एका शिक्षकाने तिला डीबी स्टारशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला.

चार दिवस, चार धक्के
चमूने या विद्यार्थिनीची भेट घेतली. मुलगी नागपूरची राहणारी असून गेल्या साडेचार वर्षांपासून शहरात वास्तव्यास आहे. विभागातील एक शांत, हुशार आणि सर्वांमध्ये मिसळणारी विद्यार्थिनी म्हणून तिची ओळख आहे. मात्र, अडीच महिने तिच्यासाठी शिक्षेप्रमाणे गेले. अखेर तिने पुढाकार घेत लढा देण्याचे ठरवले. तिची व्यथा तिच्याच शब्दांत..

नोव्हेंबरमध्ये सुरुवात
संध्याकाळी साडेसातच्या सुमारास एका स्पर्धेची तयारी आटोपून मी एमजीएम महाविद्यालयातून खोकडपुºयातील शिवाजी हायस्कूलच्या मार्गावरून विद्यापीठात परत यायचे. एक जण काळ्या स्कॉर्पिओ गाडीतून माझा पाठलाग करत असल्याचे लक्षात आले. माझ्या दुचाकीमागे तो गाडी आणायचा आणि विद्यापीठ गेटजवळून गायब व्हायचा. मी सुरुवातीला दुर्लक्ष केले. नंतर त्याचा त्रास अधिकच वाढला. एक दिवस तर त्याने मला दुचाकीवरून ओढत गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. मी कशीबशी सुटले आणि जोरात गाडी चालवत होस्टेलमध्ये पोहोचले. तो दिवस खूप दहशतीखाली गेला. नंतर तो 10-15 दिवस आला नाही. मीसुद्धा नागपूरला गेले होते. परतल्यानंतरही दोन-चार दिवस चांगले गेले. आता हा त्रास संपल्याचा आनंद होता, पण गेल्या शुक्रवारी 11 जानेवारी रोजी तो पुन्हा माझा पाठलाग करू लागला.

स्वत:चा जीव वाचवावा की त्याच्या नोंदी कराव्यात?
एरवी अज्ञात वाहन, अज्ञात चोर, अज्ञात मारेकरी असे शब्द आम्ही नेहमीच ऐकतो. मग मुलींना छेडणाºयांना अज्ञात टवाळखोर किंवा अज्ञात रोडरोमिओविरुद्ध पोलिस तक्रार का घेत नाहीत? खरे तर कुणी छेडछाड करत असताना स्वत:चा जीव वाचवण्याशिवाय दुसरे काहीच सुचत नाही. मग अशा वेळी मी गाडीचा नंबर, त्या गुंडाचे नाव कसे विचारणार? पोलिस थोडे संवेदनशील का होत नाहीत? असा सवाल या त्रस्त मुलीने केला आहे.

का घेत नाहीत पोलिस तक्रार ?
पोलिस ठाण्यात अनेक प्रकारच्या तक्रारी घेऊन सर्वसामान्य नागरिक जातात, परंतु प्रत्येक तक्रारीची नोंद घेतली जातेच असे नाही. कारण एकदा का तक्रार रजिस्टरवर नोंद झाली की त्याचा तपास संबंधित अधिकाºयाकडे द्यावा लागतो. तक्रारीचे काय झाले याचा अहवालही वरिष्ठांना सादर करावा लागतो. जास्त प्रलंबित तक्रारी असतील तर पोलिस ठाण्याचे रेकॉर्ड खराब होते. हे टाळण्यासाठी बहुतांश प्रकरणांत तक्रारी दाखल करून घेतल्या जात नाहीत.

घटना घडल्यानंतर कारवाई करणार काय?
दिल्लीतील बलात्काराची घटना ताजी असताना विद्यापीठ आणि पोलिसांना अजूनही जाग आलेली नाही. मुलींच्या संरक्षणाबाबत ही यंत्रणा किती कुचकामी आणि संवेदनाहीन आहे, हेच यातून दिसून आले. डीबी स्टारने हे प्रकरण गांभीर्याने घेताच पोलिस कामाला लागले. तोपर्यंत ते काही हालचाल करायला तयार नव्हते. मुलींना सुरक्षित वाटावे असे काम पोलिसांकडून अपेक्षित आहे. एखाद्या मोठ्या संकटाची ते वाट बघतात काय, असा प्रश्न पडतो. येथील प्रकरणात आता तरी त्यांनी तक्रार नोंदवावी व आरोपीला पकडून गजाआड करावे.
-पीडित तरुणी


दहशतीखालील पाच दिवस

शुक्रवार, 11 जानेवारी
मी स्पर्धेची तयारी संपवून विद्यापीठातील होस्टेलमध्ये परतत असताना अचानक ज्युबिली पार्कजवळ तो पुन्हा दिसला. तो माझी वाटच बघत होता. मला पाहताच त्याने गाडी काढली आणि पाठलाग सुरू केला. मला पुन्हा मागचा त्रास आठवला. मी वेगाने गाडी काढली. यामुळेच त्याने पाठलाग करण्याचा विचार सोडून दिला. तो घाटीच्या गेटमधून गाडी आत घेऊन गेला.

शनिवार, 12 जानेवारी
गेली साडेचार वर्षे शहरात असलेल्या वास्तव्यातील सर्वात दु:खद दिवस हाच होता. दुपारची वेळ होती. दुसरा शनिवार असल्यामुळे सर्वत्र शांतता होती. विद्यापीठात नामविस्तार दिनाची तयारी सुरू होती. मी एटीएममधून पैसे क ाढण्यासाठी आत जाऊ लागले. तेथे तो एका बाईकजवळ एकटा उभा असल्याचे दिसले. मी गुंड नाही, असे म्हणत तो माझ्याजवळ आला आणि मैत्री करायची असल्याचे म्हणाला. मी नकार दिला आणि जाऊ लागले. त्याने माझा हात ओढून मला वळवले. मी खूप घाबरले. कसाबसा हात सोडवला आणि तेथून निघाले. पोलिसांत तक्रार देईन, अशी तंबीही त्याला दिली. यावर पोलिसांकडे गेलीस तर बघून घेईन, अशी धमकी त्याने दिली. मी लगेच माझ्या सरांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी होस्टेलच्या वॉर्डन आणि पोलिसांत तक्रार देण्याचा सल्ला दिला.

रविवार, 13 जानेवारी
मी प्रभारी वॉर्डनकडे तक्रार द्यायला गेले. त्यांनी मला सबुरीचा सल्ला दिला. कुलगुरू, कुलसचिव, बीसीयूडी संचालकांकडे जाण्याची गरज नसल्याचे त्या म्हणाल्या. 16 जानेवारी रोजी विद्यापीठात महिलांच्या लैंगिक छळावर आयोजित कार्यशाळेत सहभागी होण्याचा सल्लाही त्यांनी दिला. मग मी एमजीएमच्या सरांसोबत बेगमपुरा पोलिस ठाणे गाठले. हेडकॉन्स्टेबल गायकवाड यांनी आमची तक्रार ऐकली व आम्हालाच तुम्ही मुलाला ओळखता काय ? त्याच्या गाडीचा नंबर घेतलाय काय ? त्याचे घर माहिती आहे काय ? असे प्रश्न विचारले. आम्ही नाही म्हणताच मग कोणत्या आधारावर तक्रार घ्यायची, असा उलट सवाल त्यांनी केला. त्यांनी मुलगा त्रास देत असेल तर रस्ता बदलून टाक, अशी सूचनाही त्यांनी केली. त्यांनी एमजीएम ते विद्यापीठासाठी कोणता पर्यायी मार्ग आहे, याचीही सविस्तर माहिती दिली, हे विशेष..

सोमवार, 14 जानेवारी
विद्यापीठ साथ देत नाही, पोलिसही तक्रार घेत नाहीत, अशा दुहेरी चक्रात मी अडकले होते. सरांनी डीबी स्टारकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मी डीबी स्टार प्रतिनिधींना भेटले. त्यांनी सहकार्य केले. छेडछाडविरोधी पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक राहुल फुला यांना याबाबत माहिती दिली आणि संपूर्ण चित्रच पालटले.

मंगळवार, 15 जानेवारी
उपनिरीक्षक राहुल फुला यांनी प्रकरण गांभीर्याने घेतले. त्यांनी मंगळवारी सकाळी विद्यापीठात ट्रॅप लावला. बराच फौजफाटा आला होता. बराच वेळ त्यांनी पाहणी केली. संपूर्ण माहिती घेतली. आरोपीला तत्काळ अटक करण्याचा विश्वास त्यांनी दिला. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेली दहशत थोडी कमी झाली आहे.

तक्रार मिळताच कामाला लागलो
मुलीने आम्हाला छेडछाडीची तक्रार दिली आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे आम्ही तत्काळ कामाला लागलो. लवकरात लवकर आम्ही मवाल्याला गजाआड करू. शहरातील महिला आणि मुलींची सुरक्षा आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.
- राहुल फुला, पोलिस उपनिरीक्षक, छेडछेडाविरोधी पथकप्रमुख

वॉर्डन नॉट रिचेबल
या प्रकरणी होस्टेलच्या प्रभारी वॉर्डन ज्योती सोनवणे यांच्याशी विद्यापीठातील दूरध्वनी क्रमांक 2401995 वर संपर्क साधला असता त्या गावी गेल्याचे सांगण्यात आले. सोनवणे यांच्या 9403637116 भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता मोबाइल नॉट रिचेबल होता.

तक्रार नोंदवणे बंधनकारक
कुठल्याही सामान्य माणसाला अज्ञात व्यक्तीकडून त्रास होत असेल, तर त्याविरूध्द तक्रार दाखल करून घेणे हे कायद्याने बंधनकारक अहे. विशेषत: महिलांच्या बाबतीत पोलिसांनी अधिक संवेदनशील होऊन काम करायला हवे. यासाठी संबंधित व्यक्तीबाबत वर्नणात्मक बाबींचा विचार करून पोलिस तपास करू शकतात. यात मुलीची तक्रार असल्यास तिला पोलिसांनी संरक्षण द्यायलाच हवे. सर्व महिला संघटना त्या मुलीच्या पाठीशी आहे.
-प्रा. भारती भांडेकर, अध्यक्ष, जागृती मंच