आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्काराचे समर्थन कोणत्या संस्कृतीत बसते?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महिलांना सुरक्षा देऊ, असे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारमधील मंत्रीच बलात्काराचे समर्थन करतात. महिलांविषयी अनुद्गार काढले जातात, हे कोणत्या संस्कृतीत बसते, असा सवाल महिला काँग्रेस आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा शोभा ओझा यांनी पत्रकारांशी बोलताना केला. केंद्र सरकारच्या मंत्र्यांची वक्तव्ये ही प्रत्येक महिलेचा अवमान करणारी असल्याने त्यांना लवकरात लवकर त्यांच्या जागी म्हणजेच सत्तेबाहेर फेकायला हवे, असेही त्या म्हणाल्या.

येत्या १९ तारखेला काँग्रेसचा दिल्लीत मोर्चा असून त्यासाठी महिला काँग्रेस पदाधिका-यांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यासाठी त्या आधी नाशिक आणि आज औरंगाबादेत आल्या होत्या. येथील महिला पदाधिका-यांशी चर्चा केल्यानंतर महिला सुरक्षेच्या विषयावर त्यांनी मोदी सरकारचे वाभाडे काढले. त्या म्हणाल्या, केंद्रातील एक मंत्रीच बलात्काराचा आरोपी आहे.

अन्य मंत्री बलात्कार महिलांमुळेच होतात, असे म्हणतात, तर काही जण थेट सोनिया गांधी यांच्यावरच अवमानजनक वक्तव्ये करतात. त्याचबरोबर देशातील शेतकरी संकटात सापडला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र विदेश दौ-यात मश्गुल असल्याची टीका करतानाच काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी मात्र शेतक-यांना भेटून त्यांच्या व्यथा जाणून घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

ही तर धनवापसी
आघाडी सरकारने आदर्श भूसंपादन कायदा तयार केला होता. मात्र, निवडणुकीच्या वेळी भाजपला ज्या कारखानदारांनी आर्थिक मदत केली ती परत करण्यासाठी मोदी सरकार कायदा करत असून एक प्रकारची ही धनवापसी असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्यांनी निवडणुकीला पैसा दिला त्यांना तो परत करता यावा म्हणूनच सक्ती असलेला भूसंपादन कायदा मोदी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्या म्हणाल्या. या वेळी महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, राष्ट्रीय सरचिटणीस चारुलता टोकस उपस्थित होत्या.