आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिकांनी पहिल्यांदाच अनुभवले ‘विलासिनी नाट्यम’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शारंगदेव महोत्सवाच्या दुसर्‍या दिवसाची सुरुवात पं. निर्माल्य डे यांच्या धृपद गायनाने झाली. पार्वती दत्ता यांनी संशोधित केलेले ओडिसी नृत्यातील ‘वाद्यपल्लवी’ आणि गुरू स्वप्नसुंदरी यांचे विलासिनी नाट्यम रसिकांना प्राचीन भारतीय कलापरंपरांचा अनुभव देणारे ठरले.

शनिवारी रुक्मिणी सभागृहाच्या रंगमंचावर प्रस्तुत झालेली प्रत्येक रचना रसिकांना अद्भुत कलापूर्ण अनुभव देणारी होती. पं. निर्माल्य डे यांनी गायनाला सुरुवात करताच आरोह आणि अवरोहांनी परिपूर्ण गानछटा व्यक्त होऊ लागल्या. राग मुलतानीने त्यांनी गायनाला सुरुवात केली. आलाप, मध्य आलाप, द्रुत आलापच्या नादनिर्मितीनंतर त्यांनी चौतालात निबद्ध ‘तूही विधाता लोकपती’ ही पारंपरिक बंदिश पेश केली. ‘सांवरे रंग डार दियो’ या धमारनंतर त्यांनी राग सोहिलीमध्ये ‘प्रथम आदि शिवशक्ती’ ही बैजू नायक यांची रचना सादर केली. त्यांना सुखद मुंडे, र्शीकांत गोसावी आणि शेखर कुलकर्णी यांनी साथ केली.

महागामीच्या संघाची विलक्षण प्रस्तुती : आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या ‘शिवाष्टक’ या श्लोकाचे सौंदर्य गुरू पार्वती दत्ता यांनी पहिल्याच प्रस्तुतीत प्रकट केले. वसंत तिलक या साडेपाच मात्रांचे तालचक्र विलक्षण रीतीने सादर करताना त्यांनी ओडिसी नृत्याची नजाकत दाखवली. दत्ता यांनी या नृत्यरचनेची निर्मिती स्वत: केली आहे. यानंतर ‘वाद्यपल्लवी’ अलौकिक सौंदर्याने परिपूर्ण अशी नृत्यनाद असलेली प्रस्तुती आठ शिष्या आणि सात पखवाजांच्या साथीने सादर केली.

ओडिसीमध्ये स्वरपल्लवी आणि वाद्यपल्लवी असल्याचे पुरावे आहेत. मात्र, काळाच्या ओघात वाद्यपल्लवी लुप्त झाली. स्वरपल्लवीचे पुनरुज्जीवन झाले. ओडिसी तालपद्धतीच्या 15 वर्षांच्या संशोधनानंतर दत्ता यांनी वाद्यपल्लवी ही नृत्याकृती निर्मिली. तिर्श, मिर्श आणि खंडजातीच्या छंद रचना यामध्ये होत्या.

राग बिहागडा, सरस्वती आणि हिंडोलमध्ये ही रचना निबद्ध होती. ओडिसी परंपरेप्रमाणे ‘मोक्ष’ या प्रस्तुतीने सांगता झाली. पाली भाषेतील बुद्धवंदना यामध्ये करण्यात आली. वृषाली देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

अलौकिक नृत्याभिनय छटा
पद्मभूषण डॉ. स्वप्नसुंदरी यांनी गणेशवंदनेने ‘विलासिनी नाट्यम’ला सुरुवात केली. ‘विघ्नहर्ता विनाशकरा’ या श्लोकातून अभिनय, पदविन्यासांचे विलक्षण सौंदर्य त्यांनी प्रकट केले. डॉ. अनुपमा कैलाश यांच्या साथीने पल्लवी, नंतर बलिहरण सेवा, पालखी सेवा सादर केली. पारिजातम या नृत्यनाटिकेच्या अंशाने सांगता केली.