आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा लाख नागरिकांना अन्न सुरक्षेचा लाभ !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अन्न सुरक्षा योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळेल आणि कोणाला नाही याचे स्पष्टीकरण राज्य शासनाने 17 डिसेंबरला एक जीआर काढून केले आहे. त्यानुसार सध्याचे बीपीएल कार्डधारक तसेच अंत्योदय योजनेतील लाभार्थी थेट या योजनेत वर्ग करण्यात आले असून 5 लाख 93 हजार नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सध्या एपीएल कार्ड असलेल्या 95 हजार नागरिकांचा या योजनेत समावेश झाला आहे.

शहराची लोकसंख्या 13 लाख इतकी आहे. त्यातील 7 लाख नागरिक या योजनेच्या कक्षेबाहेर असून सर्व मिळून 5 लाख 93 हजार नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 17 डिसेंबरला शासनाने जारी केलेल्या जीआरनंतर अन्नधान्य पुरवठा विभागाचे नियोजन सुरू झाले आहे. नेमके किती जण या योजनेच्या कक्षेत येतात हे स्पष्ट झाल्यानंतर योग्य दिशेने योजना राबवण्याची तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. 17 डिसेंबरला जीआर प्राप्त झाला असून त्यानुसार आम्ही काम करत असल्याचे अन्नधान्य पुरवठा अधिकारी किशोर देशमुख यांनी म्हटले आहे.
असे आहे चित्र

औरंगाबाद शहराची लोकसंख्या- 13,09,106
- अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करावयाची लोकसंख्या- 5,93,549
- (एकूण लोकसंख्येच्या 45.34 टक्के शहरी भागातील लोकसंख्या या कक्षेत येते)
- बीपीएल व अंत्योदय मिळून लोकसंख्या- 4,98,000
- त्यानंतर 95 हजार 69 हजार एपीएलमधील लोकसंख्येला या योजनेचा लाभ मिळेल.

एकक काय असेल?
- वार्षिक 59 हजारांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांपैकी एपीएलमधील लोकसंख्येची निवड केली जाईल.
- अन्न सुरक्षा योजनेत न येणार्‍या कुटुंबांना सध्याच्या दराने स्वस्त धान्य मिळेल, असे तूर्तास सांगण्यात आले असून त्याबाबतचे धोरण स्पष्ट करणारा जीआर लवकरच अपेक्षित आहे. शहरात अशी लोकसंख्या 7,15,557 इतकी आहे.

योजनेत समावेशाचे निकष
- शहरी भागात एकूण लोकसंख्येच्या 45.34 टक्के, तर ग्रामीण लोकसंख्येच्या 76.32 टक्के नागरिकांचा समावेश करण्यात येईल.
- बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांचा थेट समावेश होईल. शहरी भागात 45 टक्क्यांचे, तर ग्रामीण भागात 76 टक्क्यांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी वार्षिक उत्पन्नाचा आधार.
- ग्रामीण भागात वार्षिक उत्पन्न 44 हजार इतके आहे.