आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ravi Maintain Second Side A Story By Rupesh Kalantri In Marathi

रावीने सांभाळली ‘दुसरी बाजू’, राहिला किरण मोरेंचा यशाचा स्कोअर समाधानकारक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटमध्ये पार्टनरशिपला फार महत्त्व. दोघे खेळत असताना धावा घेणेही गरजेचे असते. एक जण जोरात खेळत असेल तर दुसर्‍याने संयमाने बाजू सांभाळणे अपेक्षित आहे. वैवाहिक जीवनाचेही असेच आहे. मग हे क्रिकेटरचे वैवाहिक जीवन असेल तर ‘दुसरी बाजू’ म्हणजेच कुटुंब सांभाळणे आणखीनच महत्त्वाचे होते. किरण मोरे यांची पत्नी रावी यांनी ही बाजू तर सांभाळलीच, शिवाय कायम पाठीशी राहिल्या. त्यामुळेच किरण यांच्या यशाचा स्कोअर समाधानकारक आहे.

किरण मोरे म्हणजे लहानपणापासूनच एक खेळाडू. त्यांना कोणत्याही खेळाचे वावडे नव्हते. कबड्डी असो, खो-खो वा पावसाळ्यात फुटबॉल. त्यांचा सर्वत्र संचार. त्याचे कारण म्हणजे बडोद्यासारखे खेळांसाठी पोषक वातावरण. त्यात क्रिकेट म्हणजे इथल्या मातीतच. त्यामुळे आपल्यासारखाच टेनिस बॉल क्रिकेट तिथे सर्वत्र सुरू असे. फरक फक्त एवढाच की त्या टीममध्ये अंशुमन गायकवाड, विजय हजारे यांच्यासारखे दिग्गजही असायचे. त्यामुळे खेळाडू किरण क्रिकेटकडे वळले नसते तरच नवल.
‘खो-खो’देखील गाजवले
खेळांमध्ये प्रावीण्य असलेल्या किरण यांनी खो-खोमध्ये राज्याच्या संघापर्यंत मजल मारली. या बरोबरच क्रिकेटही जोरात होते. टेनिसनंतर सीझन बॉलने खेळणे सुरू झाले. त्यातही यश मिळायला लागले. बडोद्याने अनेक दिग्गज क्रिकेटर दिल्याने स्वाभाविकच क्रिकेटने खो-खोची विकेट घेतली. मात्र, त्यांचा निर्णय योग्य ठरला. त्यामुळेच विकेट किपर म्हणून ते क्रिकेट विश्वावर छाप पाडू शकले.
सुरुवातीपासून विकेट किपर
किरण मोरे यांनी क्रिकेट खेळताना सुरुवातीपासूनच स्पष्टता ठेवली. विकेट किपिंगच करायची त्यांनी ठरवले आणि तसे केलेसुद्धा. त्यात संधी मिळेल किंवा नाही याचा विचार केला नाही. म्हणूनच ते म्हणतात, ‘आय माईट बी ए बॉर्न विकेट किपर.’ ही गोष्ट खरी ठरली. गुरू नारायण चटप यांनी किरण यांच्यातील क्षमतेला आकार दिला. त्यामुळे 19 वर्षांखालील स्पर्धेत त्यांची निवड झाली. रणजी, दुलीप ट्रॉफी खेळण्याची संधी मिळाली.
चलो मुंबई
त्यावेळी वेगवेगळ्या कंपन्यांच्या क्रिकेट टीम होत्या. त्यांची नजर युवा खेळाडूंवर असायची. किरण यांचे वेगळेपण डोळ्यात भरत होते. त्यांच्या चमकदार कामगिरीमुळे टाटा संघाने त्यांना संधी देत शिष्यवृत्ती दिली. त्यामुळे मुंबईत खेळाला सुरुवात झाली आणि व्याप्ती वाढायला लागली. कॅप्टन गावस्कर, वेंगसरकर, शास्त्री, रेगे यांच्या सहवासातून विश्वास वाढायला लागला.
पैशाशिवायची प्रसिद्धी
क्रिकेट म्हणजे बक्कळ पैसा, असे आजचे समीकरण आहे, पण त्याकाळी क्रिकेट म्हणजे प्रसिद्धी वजा पैसा असे गणित होते. एका टेस्ट मॅचसाठी 5 हजार रुपये तर वनडेसाठी 7 हजार मिळायचे. शिवाय सामनेदेखील कमी होत. जाहिरात जगतही आजसारखे वाढलेले नव्हते. पत्नीला सोबत घेऊन जाण्याचा खर्च पेलणे शक्य नव्हते. त्यामुळे लग्नानंतर पत्नी बडोद्याला आणि किरण दौर्‍यावर अशी स्थिती होती. नेमके 18 वर्षे पूर्ण केलेल्या या मुलीसाठी सगळ्याच गोष्टी नवीन होत्या. घरखर्च सांभाळण्यापासून स्वयंपाक शिकण्यापर्यंत सगळ्यांमध्येच रावी यांचा ‘डेब्यू’ होता. म्हणूनच त्या म्हणतात, ‘ किरणने मी तयार केलेला वाट्टेल तसा स्वयंपाक खाल्लाय, पण कधी म्हणजे कधीच तक्रार केली नाही.’ अर्थातच नणंद-सासूबाईंमुळे त्या हळूहळू सर्व शिकल्या आणि कुटुंबाच्या ‘कॅप्टन’ झाल्या.
शिस्तप्रिय पालक
प्रेमाच्या आठवणींना हृदयाला लावून ठेवणारी ही पत्नी पाल्यांसाठी आई आणि वडीलही राहिली. त्यामुळे दोन्ही मुलींना त्यांनी शिस्त लावण्यावर जोर दिला. स्वत:ची कामे स्वत: करण्यापासून आपण ‘स्पेशल चाइल्ड’ नाही हे बिंबवले. मी आणि माझी मुलगी सोबत वाढले, असे रावी सांगतात. आज रुही दिग्दर्शनाच्या क्षेत्रात यश मिळवत आहे. तर जाही पुण्यात शिकत आहे. किरण मोरे हे आपले वडील आहेत हा बडेजाव तर दूर त्या ही माहिती देखील स्वत:हून सांगत नाहीत. आईची ही शिकवण आम्हाला आयुष्याचे खरे अनुभव देत असल्याचे जंजीर आणि धूमकेतूची सहायक दिग्दर्शक रुही सांगते.
भारतीय संघासोबत विदेशवारी
किरण यांना 1982-83 मध्ये संघाबरोबर किरमाणी यांचा अंडरस्टडी म्हणून वेस्ट इंडीजला जाण्याची संधी मिळाली. त्यावेळी सामना खेळला नसला तरी चांगला अनुभव मिळाला. पुढे त्यांनी रणजी सामन्यात विक्रमी कामगिरी केली. परिणामी 1984 मध्ये पुण्यात त्यांना भारतीय संघात स्थान मिळाले.
अखेर खेळण्याची संधी
एक वर्षाच्या अवकाशानंतर त्यांची आॅस्ट्रेलिया दौर्‍यासाठी निवड झाली. मात्र खेळण्याची संधी मिळाली नव्हती. अशातच सय्यद किरमाणी यांना दुखापत झाली. त्यामुळे किरण यांना संधी मिळाली. इथूनच भारतीय संघासाठी खेळण्याची सुरुवात झाली. दुसरीकडे खासगी आयुष्यातील इनिंगकडे सगळ्यांचे लक्ष होतेच.
मुंबई-पुणे-मुंबई
किरण यांचे सरावासाठी पुण्यात जाणे व्हायचे. तेथे त्यांचे अनेक परिचित होते. अशातच मिलिंद गुजाल यांच्या घरी रावी यांची पहिल्यांदा भेट झाली. क्रिकेटमुळे प्रकाशझोतात असलेल्या किरण यांना रावी यांचा साधेपणा आवडला. सरावासाठी त्यांचे मुंबई-पुणे-मुंबई सुरू होतेच. मिलिंद हे त्यावेळचे वॉट्सअ‍ॅप होते. तिला ‘हाय’ सांग, तिच्याकडून हॅलो आलाय, असं ते दोघांना कळवायचे. त्यातच साधारण तीन महिने किरण पुण्यातच क्रिकेटचा सराव करायचे. यामुळे भेटी वाढत गेल्या.
मोठा त्याग
रावी यांना संगीताचे वेड आहे. त्या उत्कृष्ट गायिका आहेत. ज्योत्सना आणि केशवराव भोळे यांच्या नात असल्याने आनुवंशिक गुण मिळाला. मात्र किरण यांच्या व्यग्र जीवनामुळे त्यांनी कुटुंब आणि मुलांकडेच लक्ष दिले. त्यामुळे त्यांना गायनाकडे लक्ष देता आले नाही, पण पुढे कुटुंबाच्या जबाबदार्‍या सांभाळून झाल्यानंतर किरण यांनी रावी यांच्या स्वप्नाला बळ दिले. त्यांनी अनूप जलोटा यांच्यासोबत ‘इश्क मे अक्सर’ हा अल्बम काढला. आगामी काळात त्यांचे आणखी एक गाणे ऐकायला मिळू शकते.
त्यांचा त्याग मोठा
इतक्यात फॅमिली अल्बम पाहताना किरणच्या डोळ्यात पाणी आले. मुली वाढत असतानाचे क्षण मिस केल्याचे त्याला जाणवत होते. मोठ्या मुलीला कॉलेजसाठी बाहेरगावी पाठवतानाही तो इमोशनल झाला होता. आपली मुलगी इतकी मोठी झाली, हे त्याला कळलेच नाही. त्याने केलेला हा त्याग माझ्यापेक्षा फार मोठा आहे. असा मितभाषी, साधा व्यक्ती मिळाला म्हणून जीवनसंगीत मधुर झाले.
- रावी मोरे

आठवणींचा सुगंध
25 सप्टेंबर 1989 रोजी दोघांची वैवाहिक इनिंग सुरू झाली. आता दोन महिन्यांत 25 वर्षांचा प्रवास पूर्ण होणार आहे. मात्र, रावी यांनी आपल्या प्रेमाच्या आठवणी अजूनही जपून ठेवल्या आहेत. त्यांच्या पुण्याच्या घरी किरण भेटायला गेले होते. परतत असताना अंगणात पडलेले एक चाफ्याचे फूल त्यांनी रावीला दिले. ते फूल त्यांनी अजूनही पुस्तकामध्ये जपून ठेवले आहे. शिवाय लग्नाच्या आधी दिलेल्या बुकेची रिबिन आणि शुभेच्छा कार्डदेखील आठवणींचा सुगंध दरवळत ठेवतो.
पुढील स्लाईडवर वाचा, दोघांचा चालत होता पत्रांद्वारे संवाद....