अक्षर सुधारावे यासाठी अनेक जण आयुष्य घालवतात. तरीही त्यांना म्हणावे असे यश येत नाही, पण शहरातील एका युवकाने एकाचवेळी दोन्ही हात आणि दोन्ही पायांनी लिहिण्याची अफलातून कला आत्मसात केली आहे. एवढेच नव्हे, तर हाताचे दोन्ही कोपरे आणि तोंडानेही तो लिखाण करतो हे विशेष. त्याच्या या कलेमुळे इंडिया बुक रेकॉर्डबरोबरच आंध्रा बुक रेकॉर्डमध्येही त्याच्या नावाची नोंद झाली आहे.
शहरातील एसएसयूपी नर्सिंग कॉलेजमध्ये बीएस्सी नर्सिंगचे शिक्षण हा युवक घेत आहे. बीड जिल्ह्यातील खोकरमोहा येथील रहिवासी असणा-या या कलाकाराचे नाव रवींद्र त्र्यंबक मिसाळ असे आहे. वडील हॉटेल व्यवसायाबरोबरच शेती करतात. रवींद्रला युपीएससीची परीक्षा देऊन मोठा अधिकारी व्हायचे आहे.
थ्री इडियट्समधून घेतली प्रेरणा : रवींद्रने आपल्या मित्रांबरोबर आमिर खान यांचा थ्री इडियट्स हा चित्रपट पाहिला. त्यात एकाच वेळी दोन्ही हातांनी लिहिणारा वीरू सहस्रबुद्धे नावाचा प्राचार्य त्याने पाहिला. चित्रपट पाहून रूमवर आल्यानंतर त्याच दिवसापासून दोन्ही हातांनी लिहिण्याचा निश्चय रवींद्रने केला. त्याचा सराव सुरू झाला. सुरुवातीला अपयश येत होते, पण त्याने जिद्द सोडली नाही. काही दिवसांतच तो दोन्ही हातांनी लिहायला शिकला. एवढ्यावर न थांबता त्याने पायांच्या बोटांनीही लिहिण्याची कला आत्मसात केली. सामाजिक कार्याची आवड: रवींद्रला समाजाची सेवा करायची आहे. रक्तदान, नेत्रदान करून समाजाचे उतराई होण्याचा त्याचा कायम प्रयत्न असतो.
समाजसेवा करणार
मी सहज म्हणून ही कला आत्मसात केली. आता गिनीज बुक रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी अशी इच्छा आहे. यापुढे समाजसेवेत वाहून घेणार आहे.
-रवींद्र मिसाळ