आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सिल्लोड - बोट धरून ज्या गुरुजींनी विद्यार्थ्यांना सरस्वतीचे मंदिर दाखवले. हसतमुख राहून दु:ख लपवले, त्यांच्या अपघाती निधनानंतर चंद्रमौळी झोपडीतील त्यांचे अठराविश्वे दारिद्र्य समोर आले. सहकारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मन हेलावले. प्राणांची किंमत पैशाने करत येत नाही, पण विद्यार्थ्यांनी गुरूंच्या गरीब कुटुंबीयांना मदत करण्याचे ठरवले. पाहता-पाहता हात पुढे येत गेले आणि सव्वा लाखाची रक्कम उभी राहिली. ही ठेव लाडक्या शिक्षकाच्या कुटुंबीयांकडे सोपवून विद्यार्थ्यांनी आदर्श घालून दिला.
शहरातील लिटल वंडर्स इंग्लिश स्कूलमधील हिंदीचे शिक्षक कडुबा गुंजाळ यांचे 19 मार्चला दुचाकी अपघातात निधन झाले. त्यांच्या जाण्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकही हेलावले. गुंजाळ गरीब होते, हे या घटनेनंतर समजले तेव्हा सर्वांनाचा धक्का बसला. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आणि सहकारी शिक्षकांनी मदतीचा हात पुढे केला.
हसतमुख चेह-यामागचे दु:ख...
मंगरूळ हे गुंजाळ सरांचे गाव. घरी अठराविश्वे दारिद्र्य, वडील दुस-याच्या शेतात सालदार. विद्यार्थ्यांच्या मनाला ही गोष्ट लागली. ज्यांनी लळा लावला ते गेले पण त्यांच्या कुटुंबीयांचे काय? सरांच्या कुटुंबाला आधार द्यायचे ठरले. 2६ मार्चला श्रद्धांजली कार्यक्रमात दोनशे विद्यार्थी पालकांसह आले. ८2 हजार ७40 रुपये मदत जमा झाली. सहकारी शिक्षकांनी एक दिवसाचा पगार दिला. त्यातून 45 हजार जमले. एकूण 1 लाख 2७ हजार 40 रुपयांची गुरुदक्षिणा देऊन चिमुकल्यांनी उतराई होण्याचा प्रयत्न केला.
असा शिक्षक विरळाच
विद्यार्थ्यांच्या अडचणीला कायम धावून येणारा असा एखादाच शिक्षक असतो. मला लेझीमच्या चाली येत नव्हत्या. सरांनी त्या शिकवल्या. सतत हसतमुख राहणा-या गुंजाळ सरांनी घरच्या परिस्थितीची आम्हाला कधीही जाणीव होऊ दिली नाही. असा शिक्षक आमच्या शाळेत पुन्हा होणे नाही.’
स्नेहा गट्टाणी, इयत्ता दहावी
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.