आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनटाइम वंडर आले-गेले, आरडी अजून ताजाच- होमी मुल्लान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-तंत्रज्ञान उपलब्ध नसताना ‘शोले’मध्ये ध्वनिमुद्रणाचे, संगीताचे इतके प्रयोग आरडीने केले की तंत्रज्ञान आणि कला यांचा तसा काही फारसा संबंध नसतो हे स्पष्ट झाले. आज एवढे तंत्रज्ञान प्रगत झाले म्हणता, पण संगीतातील मेलडी हरवली. अन्नू मलिक, आदेश श्रीवास्तव, जतीन-ललित, इस्माईल दरबार अशी वन टाइम वंडर नावे कुठल्या कुठे फेकली गेली; पण आरडी आजही तेवढाच ताजा आहे हेच त्याच्या संगीताचे यश आहे, अशा शब्दांत आर. डी. बर्मन यांच्या वाद्यवृंदात पक्यरुशनिस्ट म्हणून काम पाहणार्‍या होमी मुल्लान यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आर. डी. बर्मन यांच्या गीतांवर आधारित एका कार्यक्रमासाठी होमी मुल्लान औरंगाबादेत आले होते. या कार्यक्रमाआधी त्यांनी ‘दिव्य मराठी’शी खास गप्पा मारल्या.

ते म्हणाले, आज तंत्रज्ञान पुढे गेले आहे, नवनवीन साधने आली आहेत; पण संगीतातील मेलडी हरवली आहे. आरडी, एसडी, शंकर-जयकिशन, लक्ष्मी-प्यारे यांची नावे आजही सर्वपरिचित आहेत; पण मग ज्यांचे एखाद्-दोन सिनेमे गाजले, ते अन्नू मलिक, आदेश र्शीवास्तव, जतीन-ललित, इस्माईल दरबार हे संगीतकार आता कोठे आहेत, असे विचारायची वेळ आली आहे.

तो सगळे वाजवायचा : आरडी कसे होते हे सांगताना मुल्लान म्हणाले की, जवळपास सगळी वाद्ये आरडीला यायची. महत्त्वाचे म्हणजे तो साउंड इंजिनिअर होता. त्यामुळे त्यांना कशातून संगीत निर्माण करता येऊ शकेल, याची जाण होती. काचेच्या ग्लासवर चमचा आदळला आणि तो आवाज त्यांच्या डोक्यात फिट बसला. काही महिन्यांनंतर ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ हे गाणे बसवताना सुरुवातीला त्यांनी तो आवाज वापरला. पक्यरुशन अर्थात तालवाद्यांत इतर वाद्ये तयार करून त्यांनी वापरली. मादल, रेसोरेसो, डुग्गी, बेस गिटार यांचा प्रथम वापर त्यांनीच केला.