आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद शाळेत रुजवणार वाचन संस्कृती,कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून ग्रंथपेटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ५४ प्रशाला आहेत. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी या दृष्टीने ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. याआधी शाळेत केवळ अभ्यासक्रमाची पुस्तके मिळायची. आता सामान्यज्ञानापासून ते आत्मचरित्रापर्यंतची पुस्तके मिळतील. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान पुण्याच्या स्वयंसेवी संस्थेकडून शंभर ग्रंथांची एक ग्रंथपेटी प्रत्येक शाळेला दिली जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या प्रशालांची विद्यार्थी संख्या लक्षणीय आहे. मात्र या शाळांत ग्रंथालय, खेळण्याचे मैदाने आणि प्रयोगशाळांचा अभाव हाेता. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या कलागुणांवर होत होता. अनेकदा प्रयत्न करून निधीअभावी शिक्षण विभागाला शाळांमध्ये या सुविधा निर्माण करण्यासाठी तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र, विद्यार्थ्यांसाठी या बाबी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी आणि शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. ग्रंथालयाची व्यवस्था शाळेने करायची असून एक एक ग्रंथपेटी दोन संस्थांकडून देण्यात येणार आहे. एका ग्रंथपेटीत शंभर पुस्तकांचा समावेश असणार आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीकडून (डीपीसी) एक लाख रुपयांची पुस्तके खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर शाळातील मैदानासाठी "पायका' या योजनेतून आलेल्या निधीचा उपयोग करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेला तीन ते पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रयोगशाळा तयार करण्यासाठी राष्ट्रीय माध्यमिक सर्व शिक्षा अभियानातून तरतूद करण्यात येणार आहे. यापूर्वीही ही सुविधा होती. मात्र तसे पाऊल उचलण्यात आले नव्हते. सीईओ आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी पावले उचलली आहेत.

आराखडा पूर्णत्वास येत आहे
प्रशालांमध्ये या तिन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जोरदार प्रयत्न असून आराखडा पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून विविध कलागुणांमध्ये वाढ होणार आहे.
नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी.
दोन्ही संस्थांची मनधरणी
एकलाख रुपयात ५४ शाळांतील ग्रंथालयाला पुस्तके पुरवणे अशक्य असल्याने विविध संस्थाकडे शिक्षण विभागाने संपर्क साधला होता. अजूनही संपर्क साधणे सुरू आहे. अद्याप नाशिक पुण्याच्या संस्थांनी एक एक ग्रंथपेटी प्रत्येक शाळेला देण्याची तयारी दर्शवली आहे. आणखी संस्थेचे अथवा गावकऱ्यांचे सहकार्य मिळाल्यास मोठ्या प्रमाणात ग्रंथसाठा उपलब्ध होऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...