आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rebel In Congress Women Front, 18 Warned Resignation

काँग्रेस महिला आघाडीत बंडाळी, १८ जणींचा राजीनाम्याचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली नाही, असा आरोप करत काँग्रेस महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बंडाची भाषा चालवली असून शहराध्यक्षा डॉ. विमल मापारी यांच्यासह १८ पदाधिका-यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. बुधवारी दुपारीच त्या राजीनामा देणार होत्या. मात्र, महिला प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे यांनी त्यांच्याशी बोलणी करण्याची तयारी दर्शवल्यानंतर उद्या त्यावर निर्णय होऊ शकतो, असे सांगण्यात आले.

स्वत: डॉ. मापारी यांनाही पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. परंतु डॉ. मापारी यांच्याकडे जातीचे वैध प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही, असा युक्तिवाद प्रदेशाध्यक्षा व्यवहारे यांनी केला. त्या इतक्या टोकाची भूमिका घेतील, असे वाटले नव्हते, असेही त्यांनी सांगितले. व्यवहारे या बुधवारी दुपारी शहरात दाखल झाल्या. येथील महिला कार्यकर्त्यांवर अन्याय झाला, असे मलाही वाटते. पण पक्षात सर्वांचे ऐकून घेतल्यानंतरच निर्णय घेतले जातात, असे त्या म्हणाल्या. काँग्रेसने ११३ वाॅर्डांपेकी १०८ वाॅर्डांत अधिकृत उमेदवार दिले. ५ ठिकाणी त्यांनी अपक्षांना पुरस्कृत केले. तसे करताना ५७ ठिकाणी महिलांना उमेदवारी देणे पक्षालाही अनिवार्य होते, तरीही महिला आघाडीवर अन्याय झाल्याची त्यांची प्रतिक्रिया होती.

पत्रपरिषद पुढे ढकलली
पक्षातून बंड करण्यासाठी महिला पदाधिका-यांनी दुपारी चार वाजता बैठक बोलावली होती. विशेष म्हणजे ही बैठक व त्यानंतरची पत्रकार परिषद ही गांधी भवनात होणार होती. पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षांनी एका खासगी हॉटेलात पत्रकार परिषद घेतली. बंडखोरीची भाषा करणारे मात्र गांधी भवनातच पत्रकार परिषद तसेच बैठक घेणार होते. हा प्रकार समजल्यानंतर प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, प्रदेश सरचिटणीस अॅड. जयश्री शेळके यांनी त्यांच्याशी संपर्क साधला तसेच गांधी भवनाला कुलूप ठोकण्यास त्यांनी सांगितले. त्यामुळे गांधी भवनाचे दरवाजे बंडखोरांसाठी बंद झाले होते. त्यानंतर महिला आघाडीच्या बंडखोर कार्यकर्त्यांनी एका खासगी मंगल कार्यालयात बैठक बोलावून चर्चा सुरू केल्याचे समजले. परंतु त्यात काय ठरले, याची माहिती रात्री उशिरापर्यंत त्यांनी समोर येऊ दिली नाही. तेथे प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना मज्जाव करण्यात आला होता.

प्रोटोकॉल न पाळणे चुकीचे : पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा शहरात येत असताना त्यांना भेटून तक्रार करण्याऐवजी थेट बंडाची भाषा करणे हे पक्षाच्या प्रोटोकॉलला धरून नसल्याचे प्रदेश सरचिटणीस जयश्री शेळके यांनी स्पष्ट केले, तरीही त्या आमच्याच सहकारी आहेत. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी जाऊन समजूत काढू, असे प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे म्हणाल्या.
पुढे वाचा... मतदार यादीतून मुद्दाम नावे वगळल्याचा आरोप