आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन अधिवेशने अन् ५० सभा, जिल्ह्याने अनुभवला शरद जोशी यांचा झंझावात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यातील सर्वच जिल्ह्यांप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यातही शरद जोशी यांची तोफ धडाडली होती. मग ती १९८२ मधील त्यांची एम.पी. लॉ कॉलेजमधील पहिली सभा असो अथवा १९९५ मधील झोन बंदीचे यशस्वी उपोषण. जिल्ह्यात पन्नासपेक्षा आधिक सभा घेऊन जोशींनी मराठवाड्याच्या राजधानीत शेतकरी संघटनेचा झंझावात उभा केला होता.

मराठवाड्यात शेतकरी संघटनेचा दबदबा कायम कायम पाहायला मिळाला. कापसाचे आंदोलन आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावर घेतलेल्या सभांना औरंगाबाद आणि मराठवाड्यात मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे मराठवाड्यात शेतकरी संघटना कायम प्रभावी पाहायला मिळाली. शेतकरी संघटनेच्या १२ अधिवेशनांपैकी अधिवेशने मराठवाड्यात झाली. यामध्ये दोन अधिवेशने औरंगाबादमध्ये, तर अधिवेशन नांदेडमध्ये आणि परभणी, जालनामध्ये एक अधिवेशन झाले. १९९४ मध्ये आमखास मैदानावर हेमंत देशमुख स्वागताध्यक्ष असताना हे अधिवेशन झाले होते. त्या वेळी चतुरंग शेतीच्या प्रयोगाची संकल्पना जोशींनी मांडली होती. त्यात सीता शेती (सेंद्रिय शेती), माजघर शेती (शेतमालावर प्रक्रिया करून विक्री), व्यापार शेती (शेतकऱ्याच्या मालाची स्वत:च विक्री शेतकऱ्यांनी करायची) आणि निर्यात शेती यांचा समावेश होता. त्या वेळी अधिवेशनात चतुरंग शेतीचा ठराव मांडण्यात आला होता, तर नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २००८ मध्ये कैलास तवार स्वागताध्यक्ष असताना गरवारेच्या मैदानावर अधिवेशन झाले. यामध्ये शेतीसाठी बायोटेक्नाॅलॉजीचा वापर, शेतकऱ्यांना तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचे स्वातंत्र्य, इथेनॉल या विषयांवर ठराव मांडण्यात आले होते.

सेझ विरोधात आंदोलन
१९८२ मध्ये शरद जोशींनी एम.पी. लॉ कॉलेजच्या मैदानात पहिली सभा घेतली होती. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यात ५० पेक्षा अधिक सभा घेतल्या. त्याच्या सभांना जिल्ह्यात कायम गर्दी असायची. आडगावमध्ये व्हिडिओकॉनच्या सेझच्या विरोधात त्यांनी २०१२ मध्ये सभा घेतली होती. या सभेत त्यांनी शेतकऱ्यांना आलेली नोटीस व्यासपीठावर हातात घेत फाडून टाकली. शेतकऱ्यांना नोटीस पाठवणाऱ्याचेही हेच हाल होतील, असे सांगत त्यांनी सेझविरोधात एल्गार पुकारला होता. त्यांनी सभा घेऊ नये यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यांनी कोणालाच जुमानले नाही. त्यानंतर हा सेझ रद्द करण्यात आला. मराठवाड्यात दुष्काळ पडल्यावर प्रकृती साथ देत नसतानाही दुष्काळी दौरा केला होता.

हर्सूल कारागृहामध्ये कांद्याचा भाव ९४ पैसे प्रतिकिलो
कांद्याला भाव मिळावा यासाठी २४ मे १९८० ला जोशींनी चाकणमध्ये पुणे- नाशिक रोडवर आंदोलन केले. हजारो लोकांनी रस्ता अडवल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. त्यामध्ये जोशींसहित सात कार्यकर्त्यांची दहा दिवसांसाठी हर्सूलच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. कांद्याला ५० पैसे प्रतिकिलो दर मिळावा यासाठी सत्याग्रह करण्यात आला होता. मात्र, ज्या वेळी तुरुंगात दुसऱ्या दिवशी कैद्यांना जेवण्यासाठी कांदा आणल्यानंतर त्याचा भाव विचारण्यात आला त्या वेळी हर्सूल तुरुंगाला पुरवठा होणाऱ्या काद्यांचा भाव ९४ पैसे प्रतिकिलो कळल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. ५० पैसे मागतो आणि मिळत नाही म्हणून सत्याग्रह. सत्याग्रह करतो म्हणून जेल आणि जेलमध्ये सरकारने कांदा ९४ पैसे प्रतिकिलो खरेदी केल्याचे आढळले.

...अन् झोनबंदी उठवली
१५ नोव्हेंबरला अंबाजोगाई येथे अमर हबीब तसेच इतर शेतकऱ्यांसोबत हातोडी मोर्चा काढण्यात आला होता. शेतकऱ्यांना कारखान्याच्या परिसराशिवाय इतर ठिकाणी विक्री करण्याबाबत झोनबंदी घालण्यात आली होती. ही उसावरची झोनबंदी उठवावी यासाठी मोठे आंदोलन झाले होते. त्यानंतर १९९५ मध्येच रेल्वेस्टेशनजवळील टकसाळी मंगल कार्यालजवळ त्यांनी झोनबंदीच्या विरोधात उपोषण सुरू केले होते. पाच दिवस हे आमरण उपोषण चालले होते. त्या वेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याशी चर्चा करून गोपीनाथ मुंडे यांनी मध्यस्थी करत हे उपोषण सोडवले होते. त्यानंतर राज्यात झोनबंदी उठवण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...