आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: रावसाहेब दानवेंच्या शिफारशीमुळेच यशस्वी यादव औरंगाबादच्या पोलिस आयुक्तपदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद येथील पोलिस आयुक्त पदावर यशस्वी यादव यांची बदली करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी  मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती आणि त्यांच्या नियुक्तीसाठीच हे पद अवनत करण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली आहे.

वाढती लोकसंख्या आणि दहशतवादी कारवायांची वाढती संख्या लक्षात घेता औरंगाबाद येथील पोलिस आयुक्त हे पद उन्नत करण्याची आवश्यकता आहे. तसे करण्याऐवजी ते पद पोलिस उपमहासंचालक पदापर्यंत अवनत करून त्या पदावर ठाणे येथील तत्कालीन अतिरिक्त पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांची बदली करण्यात आली. गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा निर्णय का घेतला हे कोडे होते. मात्र, रावसाहेब दानवे यांच्या आग्रहामुळे मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असल्याची कागदपत्रे ‘दिव्य मराठी’च्या हाती लागली आहेत. 

रावसाहेब दानवे यांनी एक एप्रिल २०१७ या तारखेचे पत्र थेट मुख्यमंत्र्यांना लिहीले आणि त्यात यशस्वी यादव यांची औरंगाबादला आयुक्त म्हणून पदस्थापना करण्यात यावी, अशी एका ओळीची शिफारस केली. मुख्यमंत्र्यांनी त्या मागणीखाली आणि दानवे यांच्या नावाखाली ठळक रेष मारीत ते पत्र अतिरिक्त मुख्यसचिवांकडे पाठवले. त्यानंतर पोिलस अस्थापना मंडळ १ ची बैठक घेण्यात आली. त्यात उपमहानिरीक्षक दर्जाच्या १७ अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला. त्या सर्वांना अतिरिक्त आयुक्त किंवा उपमहानिरिक्षक पदावर पदस्थापना देण्यात आली. मात्र, केवळ यशस्वी यादव यांना पोलिस आयुक्त करण्यात आले. अर्थात, त्यासाठी औरंगाबादचे आयुक्तपद अवनत करण्यात आले. 

राजेंद्र सिंग यांची सही नाही
राजेंद्र सिंग अस्थापना मंडळाचे सदस्य सचिव आहेत. बैठकीला हजर असूनही या निर्णयावर त्यांनी सही केली नाही. त्यांना औरंगाबादच्या पदाची अवनती मान्य नव्हती म्हणून सही केली नाही, असे पोलिसांत बोलले जाते. मात्र, त्या संदर्भात ते सध्या बाेलत नाहीत.
बातम्या आणखी आहेत...