आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेएनईसीत विद्यार्थ्याचे रॅगिंग, मित्रांनीच केली बेदम मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सिडकोतील जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयात सोमवारी रात्री रॅगिंगचा प्रकार घडला. अभियांत्रिकीच्या इन्स्टॉलेशन अँड कंट्रोल अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या अजय दत्तात्रय चंद्रवंशी (२१) या विद्यार्थ्याला रुमपार्टनर राहुल डवळे व राहुल जायभाय यांनी ३० ऑगस्ट रोजी मारहाण केली. या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात रॅगिंगचा गुन्हा दाखल झाला आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मात्र रॅगिंगच्या घटनेचा इन्कार केला असून विद्यार्थ्यांचे आपसातील भांडण असल्याचे स्पष्ट केले आहे.
सिडको एन-६ मधील साईनगरात अजय व त्याचे मित्र राहतात. गेल्या सहा महिन्यांपासून राहुल जायभाय आणि त्यांचा मित्र राहुल डवळे अजयला त्रास देत असल्याचे अजयच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. आम्ही सांगू तसेच कर नाही तर तुझी काही खैर नाही, असे अजयला धमकावत होते. दोघांच्या दहशतीमुळे राहुल शांत बसायचा. मारहाणीनंतर चेहऱ्यावरील जखम लपवण्यासाठी तो तोंडाला रूमाल बांधायचा. ३० ऑगस्टला क्षुल्लक कारणावरून दोघांनी त्याला मारहाण केली. त्याच्या पाठीवर आणि चेहऱ्यावर अक्षरश: वळे उमटली. मित्रांच्या जाचाला कंटाळून त्याने महाविद्यालय सोडण्याचा निर्णय घेत नांदेडला गावी गेला. घरी पोहोचल्यानंतर अजयच्या अंगावरील मारहाणीच्या जखमा पाहून आई-वडील घाबरून गेले. अजयचे वडील शिक्षक आहेत. त्यांनी तत्काळ औरंगाबाद गाठले. घडलेला प्रकार प्राचार्यांना सांगितला. मारहाण करणाऱ्यांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सोमवारी सायंकाळी अजयला घाटीत उपचारार्थ दाखल करण्यात आले. पोलिसांनी राहुल जायभाय आणि राहुल डवळे यांच्यावर महाराष्ट्र छळवाद प्रतिबंधक अधिनियम कायद्याद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक आर. एस. पवार करत आहेत.

वर्षभरापासून रूममेट
अजय आणि त्याचे दोन मित्र एक वर्षापासून रूममेट आहेत. राहुल वाशीमचा तर राहुल डवळे लोणारचा रहिवासी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अजयला त्रास होत होता. मात्र त्यांनी आम्हाला सांगितले नाही. आम्ही त्यांना विचारले तर तो विषय बदलतो, असे त्याच्या वर्गमित्रांनी सांगितले. काही महिन्यांपासून तो शांत शांत राहात होता असेही त्याच्या काही मित्रांनी सांगितले.