आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Regional Board Of Education Conference In Aurangaabada

मतभेद विसरा, बोर्डाचे काम पालकांपर्यंत पोहोचवा- अध्यक्ष गंगाधर म्हमाणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गतवर्षी हॉलतिकीट, गुणपत्रिकांमध्ये प्रचंड चुका करून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची दमछाक करणा-या विभागीय शिक्षण मंडळातील कर्मचा-यांचा शिक्षण मंडळाचे राज्य अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी शुक्रवारी वर्गच घेतला. बोर्डाच्या कामाचे बाहेर कौतुकच होत नाही. त्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत चांगला संदेश पोहोचू द्या, आपसातील हेवेदावे, मतभेद विसरून चांगली कार्यसंस्कृती रुजवा, अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या.
विद्यापीठाच्या साई सभागृहात महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कर्मचारी महासंघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. या दोनदिवसीय अधिवेशनाला विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुखदेव डेरे, आमदार संजय शिरसाट, वाल्मीक सुरासे, वंदना वाहूळ, शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पठारे, संगीता अदापुरे, स्मिता देशमुख, के. टी. फ्रान्सिस, मनोज शिंदे, राजेश शहाणे, डी. आर. सूर्यवंशी, शालिकराम चव्हाण यांची उपस्थिती होती.
म्हमाणे म्हणाले, कोणत्याही क्षेत्रातील सर्वच प्रश्न सुटत नसतात. काही चांगल्या, तर काही वाईट गोष्टींचा स्वीकारही करावा लागतो. परंतु आपण जे काम करत आहोत ते ३० ते ३५ लाख विद्यार्थ्यांपुरते नाही, तर त्यांच्या कुटुंबांशीदेखील बोर्ड जोडले गेले आहे. त्यामुळे चांगली सेवा आणि कार्यसंस्कृती रुजवणे आपल्याच हाती आहे, असा कानमंत्रही त्यांनी दिला.
स्पर्धेत टिकण्यासाठी अभ्यासक्रमाची रचना
दरम्यान,राज्य अध्यक्ष म्हमाणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, सर्वच ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेनंतर मार्कलिस्ट आणि आता हॉलतिकिटेही ऑनलाइन देण्याची सुविधा बोर्डाने केली आहे. विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगली सेवा देण्यासाठी बोर्डात तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थी स्पर्धेत टिकावा या दृष्टीने अभ्यासक्रमांची रचना केली जात आहे.
त्रुटी राहिल्याची कबुली
आजपर्यंतकामकाजात काही त्रुटी राहिल्या. चांगल्या कामाचे कौतुक होण्यासाठी चांगला संदेश बाहेर जाऊ द्यावा लागेल. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरा. कार्यस्थळी आपसात मतभेद येऊ देता सहकार्याने काम करा. मागील वर्षी बोर्डाच्या हॉलतिकिटात मोठ्या प्रमाणात चुका झाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता. परंतु आता सर्व प्रक्रिया ऑनलाइन असून शाळा, महाविद्यालयांनाच सर्व प्रक्रिया करायची आहे. त्यामुळे चुका होणार नाहीत.