आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदस्य नोंदणीत भाजपची मुस्लिम मतदारांवर नजर, लक्ष्य 18 लाख, आतापर्यंतची नोंदणी 7 लाख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- केंद्र व राज्यात सत्तेत आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रव्यापी सदस्य नोंदणी मोहीम हाती घेतली आहे. मराठवाड्यात ३१ मार्चपर्यंत १८ लाख सदस्य नोंदणीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत पक्षाने विभागात ७ लाख सदस्य नोंदणी केली असून पुढील दीड महिन्यात उद्दिष्ट पार होईल, असा दावा पक्षाचे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी पत्रकार परिषदेत केला. सदस्य नोंदणी करताना मुस्लिमांना महत्त्व देण्यात येत असल्याचे समोर आले आहे. एकट्या बीड जिल्ह्यात ८ हजार ५०० मुस्लिम सदस्य नोंदवण्यात आले असून औरंगाबाद जिल्ह्यात हा आकडा पाच हजारांच्या आसपास असल्याचे बोराळकर यांनी सांगितले.
गेल्या दीड महिन्यापासून भाजपची सदस्य नोंदणी मोहीम सुरू आहे. त्यात अल्पसंख्याक विभागाच्या वतीने मुस्लिम सदस्यांची नोंदणी करण्यात येत आहे. त्यात बीड जिल्हा आघाडीवर असून स्व. गोपीनाथ मुंडे यांनी जाहीरपणे मतदान करणाऱ्यांना भाजपचे अधिकृत सदस्य करून घेण्यात आले आहे. या जिल्ह्यात ८ हजार ५०० मुस्लिम नागरिक भाजप सदस्य झाले असून त्यापाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यात पाच हजार मुस्लिम भाजपमध्ये दाखल झाल्याचे बोराळकर यांनी सांगितले. असे असले तरी भाजप सदस्य म्हणून नोंदणी करताना जातीची नोंद अर्जावर करण्यात येत नसल्याचा दावा त्यांनी केला. सदस्य नोंदणीसाठी भाजपचे सक्रिय कार्यकर्ते थेट बाजाराच्या ठिकाणी गेले होते, असेही त्यांनी सांगितले.
दोन दिवस नोंदणी-
मंगळवार व बुधवार (१० व ११ फेब्रुवारी) या दोन दिवसांत राज्यभर नोंदणी जोमाने केली जाणार आहे. यासाठी राज्यातील सर्व प्रमुख नेते व पदाधिकारी हे प्रत्येक बूथवर जाऊन थांबतील आणि लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न करतील, असेही बोराळकर यांनी स्पष्ट केले.

बोराळकरांचा दावा
भाजप सरकारने दुष्काळी शेतकऱ्यांना मदत देताना हात आखडता घेतल्याचा आरोप करण्यात येतो; परंतु याच सरकारने दुष्काळासाठी म्हणून ८०० कोटी रुपयांची भरघोस मदत केल्याचा दावा बोराळकर यांनी केला. त्याचबरोबर औरंगाबाद महानगरपालिकेसाठी ३१ कोटी, धुळे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती, साईचे औरंगाबादेत प्रादेशिक केंद्र ही राज्य सरकारच्या गेल्या १०० दिवसांची उपलब्धी असल्याचा दावा त्यांनी केला.