आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलगुरूंच्या शिष्टाईमुळे अखेर आंदोलक नरमले, कुलसचिवपदी डॉ. शिरसाटच राहणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. महेंद्र शिरसाट यांची केलेली नियुक्ती योग्य असून त्यांना पदावरून हटवले जाणार नाही, अशी ठाम भूमिका कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी घेतली. या नियुक्तीच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या ऑफिसर्स फोरम आणि कर्मचारी संघटनेचे संयुक्त शिष्टमंडळ मंगळवारी (२२ सप्टेंबर) कुलगुरूंना भेटले. त्या वेळी कुलगुरूंच्या शिष्टाईमुळे आंदोलकांनी नरमाईची भूमिका घेतल्यामुळे वादावर पडदा पडला आहे.
१५ मार्च २०१३ रोजीचा शासननिर्देशांचे पालन करत कुलसचिव, परीक्षा नियंत्रक आणि वित्त लेखाधिकाऱ्यांचा तात्पुरता कार्यभार उपकुलसचिवांना देण्याची आग्रही मागणी ऑफिसर्स फोरम आणि कर्मचारी संघटनांनी केली होती. कुलगुरूंनी तरीही १७ सप्टेंबर रोजी डॉ. शिरसाट यांना कुलसचिवपदाचा कार्यभार दिला. त्याविरोधात संघटनांनी आक्रमक पवित्रा घेऊन १८ सप्टेंबर रोजी असहकार आंदोलनदेखील केले होते. मंगळवारी पुन्हा दोन्ही संघटनांची संयुक्त बैठक झाली. दुपारी साडेतीन वाजता कुलगुरूंची भेट घेतल्यानंतर संघटनांचा विरोध मावळला आहे.

संवादाच्या माध्यमातून तोडगा काढण्यात कुलगुरू यशस्वी झाले आहेत. यापुढे महिन्यांतून एकदा अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे मान्य केले आहे. कर्मचारी, शिक्षक आणि अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन काम केल्यास विद्यापीठाची प्रगती होईल, असा विश्वास या वेळी कुलगुरूंनी व्यक्त केला आहे.
या वेळी बहि:शाल शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. कैलास पाथ्रीकर, उपकुलसचिव डॉ. डी. एम. नेटके, विधी अधिकारी स्मिता चावरे, अरविंद भालेराव, लेखाधिकारी प्रदीपकुमार जाधव यांनी कुलगुरूंसमोर विविध सूचना मांडल्या. केंद्रीय विद्यापीठाचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे, त्यासाठी डॉ. शिरसाट यांना कुलसचिव केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र आगामी काळात अधिकाऱ्यांनाही संवैधानिक पदांवर काम करण्याची संधी दिली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले, त्यामुळे आंदोलन करणार नसल्याचा पवित्रा संघटनांनी घेतला आहे. विद्यापीठाची बदनामी करणारे शैक्षणिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार देण्यात येईल, अशी भूमिका कुलगुरूंनी घेतली आहे. ऑफिसर्स फोरम आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी कुलगुरूंनी चर्चा केली.

डॉ. शोभना जोशी यांच्यावर कारवाई करा
दरम्यानडॉ. शिरसाट यांच्याकडेच कार्यभार राहू द्यावा, या मागणीसाठी डॉ. वाल्मीक सरवदे यांच्या नेतृत्वात कास्ट्राइब शिक्षक संघटनेचे शिष्टमंडळ कुलगुरूंना भेटले. त्याशिवाय डॉ. शोभना जोशी यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, प्रा. गजानन दांडगे आणि डॉ. अशोक बंडगर यांना कायम नियुक्ती देण्यात यावी, डॉ. वैजीनाथ नवरखेले यांना भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख करण्याची मागणी केली. डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. सतीश दांडगे, डॉ. सुनील कावळे, डॉ. अरविंद धाबे, डॉ. प्रशांत पगारे, प्रा. अशोक बनकर, डॉ. वंदना हिवराळे आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.